डीएच एफएल / पिरामल बँकेवर फसवणुकीचा आरोप
pcn
औरंगाबाद / प्रतिनिधी - सिनेअभिनेता,निर्माता आणि दिग्दर्शक सिध्दार्थ जाजू यांनी डीएचएफएल व पिरामल बँकेवर फसवणूक बेकायदेशीर ताबा व न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन असे आरोप केले आहेत. तसेच बिल्डरने केलेला घोटाळा देखील त्यांनी उघडकीस
आणला आहे़ ही सर्व माहिती त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या बद्दल सविस्तर वृत्त असे की, सिनेअभिनेता जाजू यांनी २०१३ मध्ये नक्षत्रवाडीतील इस्मराल्ड टाउनशीपमध्ये दोन रो हाउस बंगले दोन कोटी रूपयांना खरेदी केले़ ते बंगले ३० महिन्यात पूर्ण करून ग्राहकांना दिले जातील असे खरेदी खतात सांगण्यात आले होते़ बिल्डर राजू कुंडलवाल, बाळकृष्ण दासराव भाकरे आणि संजू कुंडलवाल यांनी सर्व टाउनशीप पूर्ण करण्यासाठी लागणारी रक्कम असून देखील ते काम पूर्ण केले नाही. तसेच १०० महिने पूर्ण झाल्यावरही जाजू यांना त्यांच्या घराचा ताबा देण्यात आला नाही़ हे बंगले घेण्यासाठी जाजू यांनी डीएचएफ एल बँकेकडून कर्ज घेतले होते परंतू काही दिवस आर्थीक अडचणीमुळे ते बँकेचा हप्ता भरू शकले नाहीत.
अडचण दूर झाल्यावर त्यांनी बँकेकडे जाउन सर्व कर्ज एकरकमी भरण्याची तयारी दर्शवली परंतू बँकेने काहीच उत्तर दिले नाही़ काही दिवसानंतर डीएचएफएल बँक पिरामल बँकेने हस्तांतरीत केली व जाजू हे मुंबई येथे वास्तव्यास असतांना पिरामल बँकेने कोणत्याही पूर्वसूचना न देता त्यांच्या दोन्ही घरांवर ताबा मिळवला. यासंदर्भात जाजू यांनी डीआरटी औरंगाबाद न्यायालयात दाद मागितली असता न्यायालयाने डिएचएफएल व पिरामल बँकेस सात दिवसाच्या आत जाजू यांचे घर त्यांना परत देण्यात सांगितले़ परंतू बँक न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून जाजू यांना त्यांच्या घराचा ताबा देण्यास टाळाटाळ करत आहे़ असे जाजू यांनी सांगितले.
इस्मराल सोसायटीतील सर्वच रहिवासी आता बिल्डर कुंडलवाल यांनी ग्राहक व बँकेकडून घेतलेले ६० कोटी रूपये कुठे खर्च केले याची चौकशी करण्यात यावी अशा मागणी ची तक्रार रेरा कडे करणार असून बिल्डर कुंडलवाल यांच्या स्थावर मालमत्तेची चौकशी करण्यासंदर्भात ईडीकडे कारवाईची मागणी करणार आहे असेही जाजू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.