कारची ट्रॅक्टरला मागून धडक
चाकुर/ प्रतिनिधी - नांदेडहून लातूरकडे भरधाव जाणाऱ्या कारने महाळंग्रा पाटीनजीक थांबलेल्या उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील ४ तरुणांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना आज (दि.३) पहाटेच्या सुमारास झाली. कारमधील तरुण तुळजापुरला दर्शनासाठी जात होते.
शिवराम हरिश्चंद्र लंकाढाई (वय २६ रा. किल्ला रोड नांदेड), मोनु बालाजी कोतवाल (वय २७), नरमण राजाराम कतरे (वय ३३), कृष्णा यादव, रा. नांदेड) अशी मृत तरुणांची नावे आहेत. शुभम किशोर लंकाढाई (रा.नांदेड) हा गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नांदेड येथील ५ तरुण कारमधून (एमएच २६ बीसी ८२८६) लातूरमार्गे तुळजापूरकडे निघाले होते. कार लातूर- नांदेड महामार्गावर असलेल्या महाळंग्रापाटी नजीक आली असता ती लातूरच्या दिशेने उभे असलेल्या उसाचे ट्रॅक्टरवर जोराची आदळली. यात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. इतर तिघांना पोलिसांनी लातूर येथे उपचारासाठी दाखल केले असता उपचारा दरम्यान दोघांचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, उपनिरीक्षक राजेश घाडगे, बीट अंमलदार भागवत मामडगे, शिरीषकुमार नागरगोजे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.