शहरात हत्याचे सत्र सुरू एकदिवसात तीन हत्या
किरकोळ वादातून एकाची हत्या,
एकतर्फी प्रेमातून मुलीची हत्या,
भांडणात एकाचा मृत्यू
औरंगाबाद : औरंगाबादेत किरकोळ कारणांवरून होणाऱ्या खुनांचे सत्र सुरूच असून, शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास नेहरूनगर भागातील पाण्याच्या टाकीखाली आणखी एक खून झाला. शिवीगाळ आणि किरकोळ वाद टोकाला पोहोचल्यानंतर १९ वर्षीय तरुणाने ३६ वर्षीय व्यक्तीच्या पोटात चाकू भोसकून हत्या केली. साबेर शहा कासिम शहा वय-३६ (रा.नेहरूनगर, औरंगाबाद) असे खून झाल्याचे नाव असून, फरहान खान निजाम खान वय-१९ (रा. नेहरू नगर) असे फरार आरोपीचे नाव आहे. ही हत्या नशेच्या नादात झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. नेहरुनगरमधील पाण्याची टाकी हा नशेखोरांचा अड्डाच बनली आहे. या ठिकाणी नशेखोर आणि दारुड्यांचे टोळके नेहमी नशापाणी करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत बसून राहतात. त्यांच्यातील वादही नेहमीच्या बाबी झाल्या आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
जावेद शहा याने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या मामाचा मुलगा साबेर शहा हा त्यांच्या घरापासून जवळच एक गल्लीच्या अंतराने राहतो. शुक्रवारी रात्री जावेद रात्रीचे जेवण करून झोपण्यापूर्वी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास लघवीसाठी घराजवळच असलेल्या नेहरूनगर पाण्याच्या टाकीकडे गेला होता. या ठिकाणी त्याला दोन जणांमध्ये जोरदार आवाजात शिवीगाळ व वाद सुरु असल्याचे ऐकू आले. जावेदने भांडण सोडविण्याच्या हेतूने जवळ जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला मामाचा दिवसा भंगार व्यवसाय करणारा आणि रात्रीच्या वेळी नेहमी दारू पिणारा मुलगा साबेर याच्याशी कुणाचा तरी वाद सुरु असल्याचे दिसले. हे भांडण सोडवून साबेरला घरी घेऊन जाऊ असे ठरवून जावेदने आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न केला.
मात्र, तेवढ्यात साबेरशी भांडण करणाऱ्या तरुणाने स्वतःजवळील चाकू काढून साबेरच्या पोटात खुपसला. यामुळे मोठ्या प्रमाणात रक्त बाहेर पडून साबेर जागीच कोसळला. हे पाहून जावेदने साबेरला वाचविण्यासाठी त्याच्याकडे धाव घेतली. यानंतर साबेरच्या पोटात चाकू खुपसणारा फरहान खान निजाम खान (१९, रा. राजूभाई यांच्या तबेल्याजवळ, नेहरूनगर) संधीचा फायदा घेऊन पळून गेला. यानंतर जावेदने साबेरचे भाऊ आमेर याला फोन करून बोलावून घेतले. त्याच्यासोबत दुसरा भाऊ साजेद हाही त्या ठिकाणी आला. तिघांनी मिळून जखमी अवस्थेतील साबेरला रिक्षातून तत्काळ घाटी रुग्णालयात नेले. तेथे त्याच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले. मात्र, पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी नेहरूनगर, कटकटगेट येथील स्मशानभूमीत साबेर याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. साबेर याच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. साबेरच्या पोटात चाकू खुपसणारा फरहान खान निजाम खान हा तरुणही नशेखोर असल्याची चर्चा आहे. त्याला कधी दारू तर कधी नशेची बटनची गोळी खाण्याची सवय असल्याची चर्चा आहे. पण या चर्चेस दुजोरा मिळू शकला नाही. फरहान आणि साबेर यांची घरे परस्परांच्या जवळच असून, त्यांच्यात आधीपासून काही वाद असण्याची तसेच नशेबाजीतून आणि त्याच वादातून हा खून झाल्याची शक्यता वरविण्यात येत आहे.