माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या कारकिर्दीची चौकशी करण्याची मागणी पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप
औरंगाबाद / प्रतिनिधी - काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात देशाच्या उपराष्ट्रपतीपदावर बसविलेले हमीद अन्सारी यांच्याविषयी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या नुसरत मिर्झा या पत्रकाराने केलेला गौप्यस्फोट गंभीर असून त्याचा देशाच्या सुरक्षिततेशी संबंध असल्याने अन्सारी यांच्या कार्यकाळाची आणि पाकिस्तानी हेराने दिलेल्या माहितीची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.अन्सारी यांच्यावरील वादग्रस्त आरोपांवर काँग्रेसनेही आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे,असे ते म्हणाले.
सन २००७ ते २०१७ या काळात हमीद अन्सारी हे देशाचे उपराष्ट्रपती होते. याच काळात त्यांच्या निमंत्रणावरून भारतात पत्रकार या नात्याने दौरे करताना भारतातील महत्वाची गोपनीय माहिती हमीद अन्सारी यांच्याकडून मिळविल्याचा गंभीर गौप्यस्फोट नुसरत मिर्झा या पाकिस्तानी पत्रकाराने केला आहे. एकदा दोनदा नव्हे,तर तब्बल पाच वेळा अन्सारी यांनी वेगवेगळ्या निमित्ताने मिर्झा यांना भारतात निमंत्रित केले होते. या भेटीत मिळविलेली माहिती आपण आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर एजन्सीला पुरवत होतो, असे मिर्झा यांनी म्हटले आहे. भारताच्या प्रत्येक शहरात पाकिस्तानी गुप्तहेरांचे जाळे पसरले असल्याचेही मिर्झा यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.त्या मुळे, मिर्झा आणि हमीद अन्सारी यांच्यातील संबंधांचा खुलासा होणे जरूरीचे असून त्या साठी अन्सारी यांची चौकशी केली जावी अशी मागणी संजय केणेकर यांनी केली. इराणचे राजदूत म्हणूनदेखील अन्सारी यांची कारकिर्द संशयास्पद असल्याचा आरोप केला जात असून देशाच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड न करता या आरोपांची तातडीने चौकशी होणे आवश्यक आहे,असे ते म्हणाले. हमीद अन्सारी यांची उपराष्ट्रपतीपदावर नेमणूक करण्याच्या काँग्रेसच्या निर्णयाचीदेखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.
देशाच्या सुरक्षिततेस बाधा येऊ शकेल अशी माहिती शत्रूराष्ट्रास पुरविण्याचा आरोप घटनात्मक पदावरील व्यक्तीवर होणे ही चिंताजनक बाब असल्याने अन्सारी यांच्या संपूर्ण कारकिर्दीची चौकशी करून केंद्र सरकारने सत्य उजेडात आणले पाहिजे. तसेच त्या वेळी केंद्रात सत्तेवर असलेल्या काँग्रेसने अन्सारी यांच्या नेमणुकीमागील भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असेही भाजप शहर अध्यक्ष संजय केणेकर म्हणाले.