नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामांना गती जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामांना गती  जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

औरंगाबाद /प्रतिनिधी - शहराच्या  जिव्हाळ्याचा विषय असलेल्या मनपा हद्दीतील 1680 कोटी रुपयांच्या नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम सध्या प्रगती पथावर आहे. दरम्यान या महत्वाच्या विषयावर जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घातले आहे. नागरिकांना लवकर मुबलक पाणी देण्यासाठी सुरू असलेली योजनेतील कामे अधिक गतीने पूर्ण करण्याचे, निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिले.

नक्षत्रवाडी येथील नवीन पाणी पुरवठा योजनांच्या कामांच्या सद्यस्थितीची प्रत्यक्ष पाहणी  चव्हाण यांनी केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजय सिंह यांनी योजनेतील सुरू असलेल्या सर्व कामांची  सविस्तर माहिती दिली. नव्याने होऊ घातलेल्या  पाच दशलक्ष लिटरची (दललि) खालील मुख्य संतुलन टाकी आणि 664 मीटर उंचीवरील 11.57 दललि मुख्य संतुलन टाकीच्या सद्यस्थितीतील कामे, 392 दललि क्षमतेचे जल शुद्धीकरण केंद्रांची कामे, नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या पाईपलाइन निर्मितीच्या फॅक्टरीतील कामकाजाच्या कामांची पाहणी  चव्हाण यांनी प्रत्यक्ष केली. ‘जीव्हीपीआर’ कंपनीचे समन्वयक प्रकाश अवधूते यांना पाइप निर्मितीच्या कामाला लवकर सुरूवात करण्याचे निर्देशही दिले. योजनेतील सर्व कामांच्या पाहणीसह शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या जुन्या मुख्य संतुलन टाक्यांचीदेखील जिल्हाधिकारी यांनी पाहणी करत योग्य त्या सूचना केल्या. पाहणीप्रसंगी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा