तलाठ्यांच्या ग्रुपवर मेसेजचा धुमाकूळ

संभाजीनगर : जिल्हा प्रशासनाने गेल्या आठवड्यात केलेल्या बदल्यांमुळे अनेकांमध्ये नाराजी, खदखद आहे. बदल्यांमध्ये अन्याय झाल्यामुळे अनेकांनी तलाठ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर खदखद व्यक्त केली
भविष्यात बदल्यांचा लिलाव आणि घोडेबाजार होण्याचा संशय अनेकांनी सोशल मीडियातील मेसेजमधून व्यक्त केला. ज्यांची बदली मर्जीनुसार झाली, त्यांच्यात तर 'पैसे कमवायचे असतील तर पैसे द्यावेच लागतील', अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, 'लोकमत'मध्ये प्रकाशित वृत्तानंतर तलाठ्यांसह प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.

३ ते १२ लाख रुपयांपर्यंतची रक्कम मर्जीतील ठिकाण मिळण्यासाठी मोजल्याची चर्चा तलाठ्यांच्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये सुरू आहे. ही रक्कम कुणी-कुणाला दिली आणि कुणी-कुणाकडून घेतली, यावरून बदल्यांच्या प्रक्रियेत असलेले वरिष्ठ अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शासनाने बदल्यांसाठी घालून दिलेल्या निकषाची पायमल्ली झाली आहे.

तलाठ्यांच्या ग्रुपवर मेसेजचा धुमाकूळ
वरिष्ठ नि:स्वार्थ बदली करतात का? स्वतःच्या बदलीसाठी प्रशासनातील वरिष्ठांकडे वशिला लावणारच, वशिला लावला तर फुकट काही करणार का? मागच्या बदल्यांमध्ये काहींनी सज्जा-मंडळसाठी ३ ते १२ लाख रुपयांपर्यंत रक्कम मोजल्याची चर्चा ऐकली आहे. आता त्याच सज्जा-मंडळसाठी १ ते २ लाख वाढवून देण्याची प्रथा पडली आहे. म्हणजे दर ३ वर्षाला सजा आणि मंडळचे भाव वाढलेले राहतील. हे करताना कोण-कोणाला फसवतंय तर आपणच आपल्याला फसवतोय, अशी भावना अनेक 'न्यायप्रिय' तलाठ्यांनी व्यक्त केली आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा