जालना येथील हृदयद्रावक घटना पाण्यात बुडून पिता पुत्राचा मृत्यू
जालना /प्रतिनिधी - जालनामध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. मंगळवारी दुपारी मुलांसह पोहोण्यासाठी गेलेल्या बाप-लेकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शहरातील मोती तलावात घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
माणिक बापूराव निर्वळ (36) आणि आकाश निर्वळ (14) अशी या पिता-पुत्रांची नावे आहेत. माणिक यांची सासुरवाडी जालना येथे असल्याने कामानिमित्त कुटुंबासह काही वर्षांपासून आले होते. अतिरिक्त लघु औद्योगिक वसाहतीतील एका लोखंड कारखान्यात कुटुंबासह राहून, ते मजुरी करीत होते. आज त्यांना सुट्टी असल्याने, ते आपल्या तीन मुलांना पोहायला शिकविण्यासाठी मोती तलावावर गेले होते, तेथे ही हृदयद्रावक घटना घडली. याप्रकरणी मयत माणिक निर्वळ यांचे मेहुणे बंडू खरात (रा. जयभवानीनगर, जालना) यांच्या माहितीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, घरात उकाडा जाणवत असल्यामुळे मुलगा आकाश याने त्याचे वडील माणिक निर्वळ यांना मोतीबाग तलावात पोहण्यासाठी जायचे आहे, असे सांगितले. त्यानंतर दोघे मोतीबाग तलाव येथे गेले होते. यावेळी आकाश पोहत असताना त्याचा तलावात बुडून मृत्यू झाला. त्याला वाचवण्यासाठी गेलेले त्याचे वडील माणिक निर्वळ यांचा तोल जाऊन तेही पाण्यात बुडाले. यावेळी बाजूला पोहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ या घटनेची माहिती अग्निशमन विभाग जालना यांना कळवली. पिता आणि पुत्रांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना चंदनझिरा पोलिसांना कळल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. एक तासाच्या अथक परिश्रमानंतर पाण्यातील गाळ टाकून वरील दोन्ही पिता-पुत्रांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जालना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.