कार्यालयातून फोटो काढणाऱ्या बंडखोरांना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह ठाकरे कुटुंबाविषयी आदर असल्याचं म्हणणाऱ्या शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी आता थेट ठाकरे कुटुंबाला लक्ष्य करण्यास सुरुवात केलीय. बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी तर आपल्या कार्यालयातून आदित्य व उद्धव ठाकरे यांचे फोटोही हटवले. त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होतेय. आता यावर स्वतः आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.
आदित्य ठाकरे म्हणाले, “आता यांचा खरा चेहरा बाहेर येत आहे. गेले एक महिना या गद्दारांचं नाट्य सुरू होतं. ते उद्धव ठाकरेंविषयी आमच्या मनात आदर आहे, आदित्य ठाकरेंविषयी प्रेम आहे, आदित्य मुलासारखा आहे असं म्हणत होते. आता त्यांच्या मनातील खरे विचार लोकांसमोर येत आहेत. त्यांना कारवाई टाळायची होती म्हणून ते स्वतःला शिवसैनिक म्हणत होते. आता तुम्ही त्यांचे खरे चेहरे बघत आहात.”
“बंडखोरांनी गद्दारी केली आहे आणि गद्दार हा गद्दारच असतो. तुम्ही लिहून घ्या हे सरकार कोसळणार आहे. सध्या कोणताही राजकीय पक्ष आनंदी नाही. गद्दारीचा हा पॅटर्न इतर राज्यात जायला लागला तर देशात अस्थिरता निर्माण होईल,” असं मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं.
“हे ४० आमदार व १२ खासदारांना जनतेसमोर जावंच लागणार आहे. जनता त्यांच्याबाबत काय निकाल द्यायचा ते ठरवेल,” असंही ठाकरेंनी नमूद केलं.
“हे ४० आमदार व १२ खासदारांना जनतेसमोर जावंच लागणार आहे. जनता त्यांच्याबाबत काय निकाल द्यायचा ते ठरवेल,” असंही ठाकरेंनी नमूद केलं.
संजय शिरसाट काय म्हणाले?
संजय शिरसाट म्हणाले की, “आदित्य ठाकरे यांचा फोटो माझ्या कार्यालयात नव्हता. उद्धव ठाकरेंचा फोटो जरूर होता. माझ्या कार्यालयात नेहमी एकच फोटो असतो. तुम्ही कार्यालयात पाहिलं तर तुम्हाला माझाही फोटो कुठे दिसणार नाही. पण आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. आम्ही त्यांच्यासोबत काम करत आहोत. त्यामुळे त्यांचा फोटो माझ्या कार्यालयात असणं अत्यावश्यक आहे.”
“शिवसेना प्रमुखांचा फोटो आयुष्यात कधीही हलणार नाही”
“राहिला प्रश्न शिवसेना प्रमुखांच्या फोटोचा, तर ते आमच्या हृदयस्थानी आहेत. त्यामुळे कार्यालयात प्रवेश करताच तुम्हाला शिवसेना प्रमुखांचा फोटो दिसेल आणि तो आयुष्यात कधीही तेथून हलणार नाही. कारण त्या शिवसेना प्रमुखांनी आम्हाला मोठं केलं आहे. शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादामुळेच आम्ही मोठे आहोत” असंही शिरसाट म्हणाले.