अमिष दाखवून वारंवार केले अत्याचार
छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी - नवऱ्यापासून विभक्त राहणाऱ्या ३४ वर्षाच्या विवाहितेला लग्नाचे अमिष दाखवून चोवीस वर्षाच्या तरुणाने वारंवार अत्याचार केले. एवढेच नाही तर पैशांची गरज असल्याचे दाखवून पैसे उकळले. त्यानंतर लग्नास टाळाटाळ करू लागला. त्यामुळे विवाहितेने पुंडलिकनगर पोलिस ठाणे गाठत तरुणाच्या विरोधात तक्रार नोंदवली. गुन्हा नोंदविल्यानंतर आरोपीस तात्काळ अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी दिली.
शुभम बाळू गवळी (२४, रा. न्यायनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पुंडलिकनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिता व आरोपी गजानन महाराज मंदिर परिसरातील एका प्रसिद्ध रुग्णालयात कामाला होते. पीडिता ही नवऱ्यापासून विभक्त राहत होती. तिला एक मुलगाही आहे. दोघांमध्ये मैत्री झाल्यानंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले. २६ सप्टेंबर २०२२ ते १ मार्च २०२३ या कालावधीत दोघांमध्ये अनेकवेळा शारीरीक संबंध प्रस्थापित झाले. आरोपीने पीडितेला लग्न करण्याचे अमिष दाखवून वारंवार अत्याचार केले. तसेच वारंवार पैशाची गरज असल्याचे भासवून फोनपेसह रोख स्वरुपात ९५ हजार रुपये उकळले.
पीडिता मागील अनेक दिवसांपासून आरोपीला लग्न करण्यासाठी विचारपुस करीत होती. मात्र, तो सतत काही ना काही कारण सांगून टाळत होता. तसेच पैसेही परत करीत नव्हता. त्यामुळे पीडितेने पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात शुभम गवळी याच्या विरोधात तक्रार नोंदवली. त्यानुसार गुन्हा नोंदवताच आरोपीस पोलिसांनी अटक केली. अधिक तपास निरीक्षक राजश्री आडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक संदीप काळे करीत आहेत.