अखेर शिक्षकाच्या खुनाचे रहस्य उलगडले

येथील सेवानिवृत्त शिक्षकाच्या खुनाचा तपास लावण्यात अखेर शिल्लेगाव पोलीसांना यश आले आहे. राहत्या घरातील हौदात पडून त्यांचा मृत्यू झाला होता. अवघ्या पाच दिवसात पोलिसांनी या घटनेचे रहस्य उलगडले.
पत्नीनेच झोपेत दगड घालून खून केल्यावर पतीला घरातील हौदात टाकून दिल्याचे समोर आले आहे. याबाबतची कबुली दिलेल्या पत्नीवर शिल्लेगाव पोलिस ठाण्यात मंगळवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन संशयित आरोपींची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. संशयित आरोपी पत्नी भारती पमुसिंग पपैया (वय ५१ वर्ष) राहणार लासुरस्टेशन शिक्षक कॉलनी असे अटकेतील महिलेचे नाव आहे.
दरम्यान लासुरस्टेशन डोणगाव रोडवरील शिक्षक कॉलनीत राहणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षक पमुसिंग छगनसिंग पपैया (वय ६४) हे १३ मार्चंला राहत्या घरातील पाण्याच्या हौदात मृत अवस्थेत आढळून आले होते. डोक्याला मार लागल्याने पोलिसांनी देखील खूनाचा संशय व्यक्त केला होता. गावकऱ्यात चर्चेला उधाण आले होते. मात्र पाच दिवसांच्या तपासानंतर शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश खटाणे, पो.काँ.हनुमंत सातपुते, अर्जुन तायडे करीत होते. त्यांनी निवृत्त शिक्षकाच्या खुनाला वाचा फोडून भौतिक पुराव्यावरून तपास केला.
खुनाच्या संशयाची सुई मनोरुग्न असलेल्या पत्नीभोवती फिरत होती. अखेर शिल्लेगाव पोलिसांनी मृताच्या मनोरुग्ण पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, मनोरुग्ण पत्नी भारती पमुसिंग पपैया (वय५१ वर्ष) हीने नवऱ्याच्या खुनाची कबुली दिली. लग्न झाल्यापासून मुलबाळ होत नव्हते म्हणून आमच्यात कायम खटके उडायचे घटनेच्या दिवशी आमच्यात कडाक्याचे भांडण झाले व रात्री पलंगावर झोपेत नवऱ्याच्या डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर कोणाला खुनाचा संशय येऊ नये म्हणून त्याचा मृतदेह घरातच असलेल्या पाण्याच्या हौदात नेऊन टाकला अशी कबुली तीने शिल्लेगाव पोलिसांना दिल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
दरम्यान शिल्लेगाव पोलिसांनी संशयित आरोपी पत्नी भारती पमुसिंग पपैया (वय 51 वर्ष) हिला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीची हर्सूल कारागृहात रवानगी केली आहे.