लॉकडाऊन बद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा मोठा खुलासा
कोरोनाचा वाढता संसर्ग व ओमायक्रोन ची वाढती रुग्ण संख्या बघता राज्य सरकार कठोर पावले उचलण्याची शक्यता आहे. कारण दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढतच आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार अशी सर्वसामन्यांमध्ये चर्चा आहे. यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, " आम्ही अगोदर देखील म्हणालो आहोत, लॉकडाउन. लॉकडाउन. असं जरी कोणी म्हणत असेल तरी तो आत्ता नाहीच. सध्या अजिबात तो विषय नाही. कारण, काल मुख्यमंत्र्यांच्या प्रदीर्घ अशा आरोग्य विभाग व टास्क फोर्स सोबत झालेल्या बैठकीत लॉकडाउनची कुठेही चर्चा नाही. निर्बंध जरूर वाढवले पाहिजे आणि लॉकडाउनची भाषा आम्ही त्याचवेळी केली की, ज्यावेळी ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर होईल, त्या दिवशी ऑटोमोडमध्ये लॉकडाउन होऊन जाईल. अशा पद्धतीने ठरवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आज इतक्या लवकर लॉकडाउनचा काही विषय नाही. नक्कीच संख्या वाढतेय हे मात्र तेवढच खरं आहे"
तसेच, "लॉकडाउनचा परिणाम हा थेट अर्थकारणावर होतो. गरीब माणूस, हातावर पोट असणाऱ्यावर होतो. लोकांनी पहिल्या दुसऱ्या लॉकडाउनची झळ सोसलेली आहे. निर्बंधांच्या बाबतीत नक्कीच कठोर कार्यवाही करण्याच काम सुरू झालेलं आहे. बेड्सची उपलब्धता आणि ऑक्सिजनचा वापर या दोन गोष्टींवरून पुढील निर्णय घेतले जातील." असंही टोपेंनी यावेळी सांगितलं.
याचबरोबर, "रूग्ण संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जे निर्बंध लागू केलेले आहेत. त्याची कठोर पद्धतीने अमलबजाणी करणे हा एक शासनासमोरचा आव्हानात्मक विषय नक्कीच आहे. त्यामुळे कोविड अनुषंगिक वर्तवणुक असो किंवा मग आता जे काही निर्बंध लागू केलेले आहेत, ते सगळे लागू करण्याचा विषय. संक्रमण होऊ नये किंवा संसर्ग वाढू नये या दृष्टीकोनातून उपाय करणं हे शासनाचं प्रथम प्राधान्य आहे." अशी माहिती देखील यावेळी आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.