दुर्बलांचे संरक्षण व सशक्तीकरण करण्याचा राजमार्ग म्हणजे भारतीय संविधान होय - डॉ.संजीव शिंदे
औरंगाबाद/प्रतिनिधी- येथील विवेकानंद महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित विशेष व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून संविधानाचे अभ्यासक प्रा. डॉ. संजीव शिंदे आमंत्रित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून फुलंब्री येथील सावतामाळी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सुरेश मुंडे आणि विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक डॉ. टी. आर. पाटील यांची विशेष उपस्थिती होती.
याप्रसंगी संविधानाचे महत्त्व स्पष्ट करताना डॉ संजीव शिंदे म्हणाले की भारतीय संविधान एक जिवंत दस्तावेज असून भारतीय स्वातंत्र्य लढ्याची ही सर्वोत्तम देण आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेने दीर्घ परिश्रम व अभ्यास करून तयार केलेले हे संविधान आजही प्रासंगिक असून प्रत्येक प्रश्न व संघर्षाची निराकरण करण्याची क्षमता या संविधानामध्ये आहे. दीन-दलित, वंचित, दुर्बलांचे संरक्षण व सशक्तीकरण करण्याचा राजमार्ग भारतीय संविधानाने दिला असल्याचेही डॉ. शिंदे म्हणाले.
आपल्या अध्यक्षीय समारोपात डॉ.सुरेश मुंडे म्हणाले की आपल्या संविधानाने प्रत्येक व्यक्ती, संस्था, संघटना यांना अधिकार तसेच कर्तव्य सोपवलेली आहेत. सामान्य व्यक्तीच्या हितसंवर्धन व राष्ट्रीय विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व व्यवस्था व प्रक्रियांचे मार्गदर्शन आपल्याला संविधानातील लाभत असते.
कार्यक्रमानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. रामदास वनारे यांच्या हस्ते मानसशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी संविधान दिनानिमित्त केलेल्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयाच्या सभागृहात संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा शर्मिष्ठा ठाकूर यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.संभाजी फोले, डॉ. भारत गोरे, डॉ. डी. के. इंगळे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.