शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा - ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर
सिल्लोड ( प्रतिनिधी ) - शेतात रासायनिक खतांची मात्रा जास्त प्रमाणात होत असल्याने दिवसागणिक कॅन्सर चे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब करून किफायतशीर शेती साठी ठिबक सिंचनाचा अवलंब करावा. तसेच शेतीपूरक व्यवसाय करीत शेतातील माल शेतकऱ्यांनीच विकला पाहिजे असे प्रतिपादन ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी सिल्लोड येथील कीर्तनात केले.
सिल्लोड महोत्सवाला राज्यस्तरीय कृषी महोत्सवाची जोड देण्यात आली आहे. आपल्या देशात 70 टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे कृषी प्रदर्शनाचे आयोजन करणे ही काळाची गरज असून शेतकऱ्यांनी कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन इंदोरीकर महाराज यांनी केले.
बुधवार ( दि. 4 ) रोजी सिल्लोड महोत्सव 2023 अंतर्गत सिल्लोड येथे ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे समाज प्रबोधनपर जाहीर कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रबोधन करीत असताना निवृत्ती महाराज बोलत होते. या कीर्तन सोहळ्यास राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रमुख उपस्थिती होती.
किर्तनातील अभंगाचा खुलासा करीत असताना सृष्टीचे सर्व चक्र हे मानवावर अवलंबून आहे, ईश्वराने दिलेल्या मानव जन्माचे सार्थक करण्यासाठी संतांच्या विचारांचे आचरण करा , शेतकऱ्यांनी लग्नावर होणारा नाहक खर्च टाळावा, एक व्यक्ती एक झाड संकल्पना राबवा, गावपातळीवरील लोक प्रतिनिधींनी ग्रामीण भागातील शिक्षण व आरोग्याच्या दृष्टीने नवनवीन प्रयोग राबवावा, संकटात सापडलेल्या इतरांना नेहमी मदत करा ,समाजकार्य, समाज उन्नतीसाठी कायम योगदान द्या, रागावर नियंत्रण ठेवून संयमी जगणे शिका, आयुष्य हसत खेळत जगा आणि वैद्यकीय दृष्ट्या ज्यांना रक्तदान करणे शक्य आहे त्यांनी रक्तदान करावे असा उपदेश ह.भ.प. निवृत्ती महाराज यांनी कीर्तनात दिला.
प्रारंभी ना. विखे पाटील आणि ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते ह.भ.प. इंदोरीकर महाराज यांचा सन्मान करण्यात आला. मंत्री ना. विखे पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधून सिल्लोड महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. सिल्लोड महोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी शेवटी उपस्थितांचे आभार मानले. निवृत्ती महाराज यांना ऐकण्यासाठी महिला पुरूषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी व्यासपीठावर मुर्डेश्वर संस्थानचे महंत ओंकारगिरी महाराज, शेलगाव संस्थानचे महंत दयानंद महाराज, महंत शास्त्री महाराज मंगरूळकर आदी साधू संतांसह सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे, वारकरी संप्रदायाचे कृष्णा लहाने, ह.भ.प.कमलाकर पिंगाळकर, बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुकाप्रमुख देविदास पा.लोखंडे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर, अर्जुन पा. गाढे, श्रीराम पा. महाजन, केशवराव तायडे, राजेंद्र ठोंबरे, दामूअण्णा गव्हाणे, नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम, न.प.तील गटनेता नंदकिशोर सहारे, महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, नगरसेविका शकुंतलाबाई बन्सोड, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, सुधाकर पाटील , शंकरराव खांडवे, प्रशांत क्षीरसागर, रतनकुमार डोभाळ, राजू गौर, मनोज झंवर आदींची उपस्थिती होती.