आरोग्य व्यवस्थेतील अनास्था पुन्हा समोर औरंगाबाद मधील धक्कादायक प्रकार
औरंगाबाद/ प्रतिनिधी- चक्क मृत पावलेल्या महिलेलाच कोरोनाची लस दिल्याचा खळबळजनक प्रकार नुकताच समोर आलाआहे.सिल्लोड तालुक्यातील उंडणगावातील महिला काही महिन्यांपूर्वी कोरोनाने मृत झाली होती. सदर महिलेचे अंतिम संस्कार देखील करण्यात आले. मात्र ७ महिन्यांनंतर १८ डिसेंबर रोजी सदर महिलेच्या मोबाईलवर पहिला डोस घेतल्याचा मॅसेज प्राप्त झाला. त्यानंतर एकंदरीत प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे आरोग्य व्यवस्थेतील अनास्था पुन्हा एकदा समोर आली आहे.
सिल्लोड तालुक्यात सध्या या घटनेची जोरदार चर्चा होत आहे. उंडणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृत पावलेल्या पार्वतीबाई अहेलाजी पाटील (वय ७८) यांना चक्क प्रशासनाने लस टोचल्याचा मॅसेज त्यांच्या मुलाचा मोबाईलवर प्राप्त झाला. सूर्यभान पाटील यांना हा संदेश मिळताच त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र सुद्धा आरोग्य विभागाकडून यावेळी जारी करण्यात आले आहे. मात्र काही महिन्यांपूर्वी २१ एप्रिल २०१९ रोजी पार्वतीबाई आजारी पडल्या होत्या.
त्यामुळे त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. घाटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान २ मे रोजी त्यांचे निधन झाले. औरंगाबाद शहरातील सिडको पोलीस ठाण्यात त्यांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर सिडको एन-८ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची नोंद आहे. मृत्यू झालेल्या महिलेला लस दिल्याने प्रशासनाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे.