वाळूच्या हायवा मुळे दोन तास वाहतुकीची कोंडी
औरंगाबाद /प्रतिनिधी - वाळूज रेल्वे उड्डाणपुलावर वाळूने भरलेला हायवा बंद पडल्यामुळे आज सायंकाळी सहा ते आठ गोलवाडी फाटा ते बाबा पेट्रोल पंप पर्यंत वाहतुकीची कोंडी निर्माण झाली.
संध्याकाळी कंपनीतून कामावरून सुट्टी झालेले लोक वाळूजहून औरंगाबाद शहरात जात असताना त्यांना वाहतुकीच्या कोंडीमुळे तास दोन तास रस्त्यावर उभे राहून त्रास सहन करावा लागला. हायवा रस्त्यावरच बंद पडल्यामुळे गोलवाडी फाटा ते बाबा पेट्रोल पंप ही शहराकडे जाणारी एक बाजू पूर्णतः जाम झाली होती.
नेमके कारण काय
गेल्या अनेक वर्षांपासून वाळुज रेल्वे उड्डाणपुलाच्या शेजारी पुलाचे काम सुरू आहे. काम अतिशय संथ गतीने होत असल्याने नेहमीच वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. वाळूज रेल्वे उड्डाणपुलावर अतिशय कमी जागा असल्याने तिथे कोणतेही वाहन बंद पडले तर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण होते. एवढेच नाहीत तिथे अपघातही मोठ्या प्रमाणात होतात. मुख्य बाब म्हणजे अवैध वाळू उपशावर बंदी असताना वाळूची वाहतूक सुरूच आहे. महसूल विभाग जाणून बुजून या गोष्टीकडे कानाडोळा करत आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.