ब्रेक निकामी झाल्याने उभ्या ट्रकला दिली धडक
छत्तीसगड येथील मुंबई-कोलकत्ता मार्गावर ब्रेक निकामी झाल्याने रस्त्यात उभा एक ट्रक पहाटेच्या धुक्यात न दिसल्याने महाराष्ट्रातून गेलेला दूसरा ट्रक त्यावर पाठीमागून धडकून भीषण अपघात झाला.
यात बीड आणि अहिल्यानगर येथील दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी पहाटे झाला.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील गहुखेल येथील गणेश नवनाथ दहिफळे ( ३०) यांचा स्वतःचा मालवाहतूक ट्रक ( क्रमांक M.H. २३,W.१९६१) आहे. १८ जानेवारी रोजी ते अहिल्यानगर येथून कांदा गोण्या ओडिशा राज्यातील बाजारपेठेत घेऊन जात होते. सोमवारी छत्तीसगड येथील महासमुंद जिल्ह्यात ते पोहचले होते. पहाटे पटेवा गावाच्या हद्दीतील मुंबई-कोलकत्ता मार्गावरून त्यांचा प्रवास सुरू होता. दरम्यान, याच रस्त्यावर ब्रेक निकामी झाल्याने उभा नादुरुस्त ट्रक धुक्यामुळे न दिसल्याने दहिफळे यांचा ट्रक त्यावर जोरात धडकला.
या भीषण अपघातात ट्रकच्या कॅबिनचा अक्षरशः चुराडा झाला. यात गहुखेल येथील गणेश नवनाथ दहिफळे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील बोधेगाव येथील सहकारी नितीन राठोड ( १८) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी अंत्यत शोकाकुल वातावरणात गणेश दहिफळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडिल, भाऊ, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.