सत्यशोधक समाज मूल्यांवर मार्गक्रमण ही काळाची गरज : प्रा.अश्विनी मोरे
औरंगाबाद/प्रतिनिधी- महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना करताना समता आणि स्त्री पुरुष समानता रुजवण्यासाठी जी विचारमुल्ये घालून दिली त्यावर मार्गक्रमण केल्याशिवाय समताधिष्ठित समाज निर्माण होणार नाही. त्यामुळे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सत्यशोधकी विचाराला अनुरूप वर्तन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रा.अश्विनी मोरे यांनी केले. सत्यशोधक समाज स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.
एकोणिसाव्या शतकामध्ये बाल विवाह, स्त्री शिक्षण, सती प्रथा आणि एकूणच स्त्रियांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आणि स्त्री पुरुष समानता स्थापन करण्यासाठी महात्मा फुले यांनी मोठे कार्य केले. समाजातील भेदात्मक संरचनेला आपल्या वाणी आणि कृतीतून छेद देण्याचे काम त्यांनी केले. त्यासाठीच त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 रोजी केली. समाजातील भेदभावाचे उच्चाटन करण्यासाठी व स्त्री-पुरुष समतेचे तत्व रुजविण्यासाठी महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मोठा संघर्ष केला. मुक्ता साळवे या महात्मा फुलेंच्या शाळेतील विद्यार्थिनीने 'महार मांग यांच्या दुःखा विषयी' हा निबंध लिहून विषमतावादी समाजाचे वास्तव मांडले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद च्या महात्मा फुले प्रतिष्ठान व ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने '24 सप्टेंबर- सत्यशोधक समाज' स्थापना दिनानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन वाणिज्य विभागातील ए.पी.जे अब्दुल कलाम सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी मंचावर महात्मा फुले प्रतिष्ठानच्या संचालक डॉ.वीणा हुंबे, कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून ताराबाई शिंदे स्त्री अध्यासन केंद्राच्या संचालक डॉ. मेहरुन्निसा पठाण यांची उपस्थिती होती. ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालक प्रा.डॉ. मेहरूनिसा पठाण यांनी अध्यक्षीय समारोप करताना, महात्मा फुले यांनी स्त्रियांसाठी व एकूणच मानवी कल्याणासाठी आजीवन कार्य केल्याचे मत मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रातील डॉ. सविता बहिरट यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. निर्मला जाधव यांनी केले. याप्रसंगी ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्रातील प्राध्यापक, कर्मचारी,वाणिज्य विभागातील प्राध्यापक व कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.