अनाथ बालिकेची शैक्षणिक जबाबदारी घेऊन केला महिला दिन साजरा
औरंगाबाद /प्रतिनिधी - दोन महिन्यापुर्वी साकेगाव येथे अपघातात आई-वडिलांचे छत्र हरपल्याने पोरक्या झालेल्या मुलीपैकी एका मुलीचे शैक्षणिक पालत्कत्व स्विकारून वैजापूर पंचायत समितीच्या उपसभापती योगिता आनंद निकम यांनी जागतिक महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा केला.
साकेगाव येथील अण्णासाहेब साहेबराव आव्हाड (३८) व पत्नी योगिता अण्णासाहेब आव्हाड (३२) यांचा दुचाकीला घराच्या दिशेने जात असताना अपघात झाला होता. या अपघातात दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या अपघाती निधनामुळे चार मुली उघड्यावर पडल्या होते.
दरम्यान, साकेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज मंगळवारी जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या शिक्षिका वर्षाराणी जाधव तर प्रमुख अतिथी म्हणून वैजापूर पंचायत समितीच्या उपसभापती योगिता आनंद निकम, सरपंच हिराबाई बापू आव्हाळे, शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा स्वाती भाऊसाहेब आव्हाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात उपसभापती योगिता निकम यांनी जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. साकेगावात झालेल्या अपघातामुळे आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या आव्हाड कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे या कुटुंबातील इयत्ता ३ री वर्गात शिकणाऱ्या आकांक्षा अण्णासाहेब आव्हाड या विद्यार्थिंनीच्या शिक्षणाची संपुर्ण जबाबदारी आपण घेत असल्याचे निकम यांनी जाहिर केले.
दरम्यान, आशा कठीण प्रसंगी सामाजिक जाणिवेतून उप सभापती योगिता निकम यांनी घेतलेल्या या निर्णयाचे गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. या विद्यार्थिनीच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी उचलून एक आदर्श निर्माण केला आहे असे मत सरपंच आव्हाळे यांनी व्यक्त केले.
<span;>या कार्यक्रमास तंटामुक्ती अध्यक्ष निवृत्ती बापू आव्हाळे, प्रा. आनंद निकम, भावराव आव्हाड, बापू नाना आव्हाळे, भाऊसाहेब आव्हाळे, रामकृष्ण आव्हाळे व साकेगाव ग्रामस्थांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक एल. टी. ठुबे, शिक्षक पी. आर. कवार , के. डी. सोनवणे, एस. एम. वाघमारे व व्ही. जे. जाधव आदींनी परिश्रम घेतले.