देवगिरी किल्ल्यात आग
औरंगाबाद / प्रतिनिधी : येथील देवगिरी किल्ला परिसरात आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक आगीचे लोट दिसून आले. या घटनेची माहिती औरंगाबाद महापालिकेच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी जाऊन अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविले यामुळे परिसरातील शेकडो झाडं वाचल्याची चर्चा होत आहे.
दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्याच्या परिसरात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास समोर आले. रस्त्याच्या कडेलाच आग लागलेली दिसून आल्यामुळे वेळीच जागरूक नागरिकांनी हे माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन विभागाचे आप्पासाहेब गायकवाड आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेऊन दोन बंबाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविले. दौलताबाद परिसरात लाईट नसल्यामुळे बोरवेल किंवा विहिरीतून पाणी उपलब्ध होत नसल्याने अग्निशमन विभागाला तारेवरची कसरत करावी लागली. अशा परिस्थितीतही अग्निशमन विभागाने अवघ्या अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवून परिसरातील शेकडो झाडांना जीवदान दिल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. यावेळी अग्निशमन विभागाचे आप्पासाहेब गायकवाड, शिवसंभा कल्याणकर, शेख अमीर, शेख समीर, वाहन चालक शेख आरिफ यांच्या पथकाने आग विझविली.