सीबीएसई पॅटर्न सर्वच शाळांसाठी लागू

सीबीएसई  पॅटर्न सर्वच शाळांसाठी लागू

आता राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून राबविण्यात येणार आहे असे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जाहीर केले.
इयत्ता पहिलीला शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये 'सीबीएसई पॅटर्न' सुरू करण्यात येणार आहे. तर, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये दोन टप्प्यात हा पॅटर्न राज्यात राबविला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी दिली.

शालेय शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी पुणे दौऱ्यावर ते आले  होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. ''विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पावले उचलली जात आहेत. त्यात राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता पहिलीला 'सीबीएसई पॅटर्न'लागू होईल, असं त्यांनी सांगितलं. 
तसेच शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये अन्य इयत्तांचा 'सीबीएसई पॅटर्न लागू होईल, त्यानुसार नवीन अभ्यासक्रम तयार करणे, त्यावर आधारित पाठ्यपुस्तके बालभारतीमार्फत छापणे अशी कार्यवाही होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

पुढे बोलताना या वर्षभरात शिक्षकांना नवीन अभ्यासक्रमाची माहिती देऊन त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याऐवजी तेथील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील. परंतु, काही शाळांमध्ये पटसंख्या शून्य आहे, अशा ठिकाणी मात्र शाळांचा विचार करायला हवा, असेही ते म्हणाले.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा विकास व्हावा, विद्यार्थ्यांना सुविधा मिळाव्यात, यासाठी शालेय शिक्षण मंत्र्यांपासून प्रत्येक शिक्षणाधिकारी एका शाळेची जबाबदारी स्वीकारेल. यात, शाळेच्या छोट्या-मोठ्या अडचणी सोडविणे, शाळेच्या विकासास हातभार लावण्याची जबाबदारी घेतली जाईल. या धर्तीवर प्रत्येक तालुक्यातील एका शाळेवर माझ्यासह सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना विशेष लक्ष द्यावे लागणार आहे'', असे भुसे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा