देशातील ह्या राज्यांची होऊ शकते श्रीलंकेप्रमाणे अवस्था
दिल्ली / प्रतिनिधी : निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये सर्व काही फुकट देण्याची स्पर्धा लागली असून त्यामुळे देशातील अनेक राज्ये देशोधडीला लागली आहेत. ही प्रवृत्ती थांबवली नाही, तर ही राज्ये श्रीलंका, ग्रीससारखी गरीब होतील, असा इशारा देशातील अनेक उच्चपदस्थ नोकरशहांनी दिला आहे. त्यांनी आपली चिंता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवली आहे.
पंतप्रधानांसोबत सुमारे चार तास चाललेल्या बैठकीत काही सचिवांनी याबाबत खुलेपणाने माहिती दिली. ते म्हणाले की, काही राज्य सरकारांच्या लोकप्रिय घोषणा आणि योजना जास्त काळ चालू ठेवता येणार नाहीत. हे थांबवले नाही तर राज्यांना आर्थिक चणचण भासणार आहे. लोकप्रिय घोषणा आणि राज्यांची आर्थिक स्थिती यांच्यात समतोल साधण्याची गरज असल्याचे त्यांनी मत मांडले. तसे झाले नाही तर या राज्यांची श्रीलंका किंवा ग्रीससारखी अवस्था होऊ शकते.
यामध्ये कोणती राज्ये समाविष्ट आहेत?
हाती आलेल्या माहितीनुसार, यापैकी अनेक सचिवांनी केंद्रात येण्यापूर्वी राज्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. ते म्हणतात की अनेक राज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही आणि जर ते भारतीय संघराज्याचा भाग नसते तर ते आतापर्यंत गरीब झाले असते. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की पंजाब, दिल्ली, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल सारख्या राज्यांच्या सरकारांनी केलेल्या लोकप्रिय घोषणा जास्त काळ चालू ठेवता येणार नाहीत. त्याचे निराकरण करणे आवश्यक आहे.