चाळीसगाव - धुळे मेमू रेल्वे पुन्हा रूळावर
सिल्लोड / प्रतिनिधी - चाळीसगाव- धुळे रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मेमू रेल्वे सेवेला आजपासून प्रारंभ झाला. राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमीन विकास व विशेष साहाय्य राज्यमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी चाळीसगाव ( जि. जळगाव ) रेल्वे स्थानक येथे मेमू रेल्वेला हिरवा झेंडा दाखविला.
यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दादाराव पाटील दानवे, खासदार डॉ. सुभाष भामरे, खासदार उन्मेश पाटील हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. चाळीसगाव येथे झालेल्या कार्यक्रमास धुळेचे महापौर प्रदीप कर्पे, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, चाळीसगावच्या नगराध्यक्षा आशालता चव्हाण, रेल्वेचे विभागीय प्रबंधक एस. एस. केडिया, सहाय्यक प्रबंधक युवराज पाटील, वरीष्ठ सुरक्षा अधिकारी श्री. गुरव आदी उपस्थित होते.
सोलापूर - जळगाव रेल्वे सेवेला ही सुरुवात करावी
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे मंत्री झाल्यापासून महाराष्ट्रातील रेल्वे सेवेत वाढ होत आहे. अनेक ठिकाणी त्यांनी नवीन रेल्वे सुरू केल्यात. मात्र त्यांना त्यांच्या जालना लोकसभा मतदार संघाचा विसर का पडला असा सवाल उपस्थित करून मंत्री रावसाहेब दानवे आपण सोलापूर - जळगाव रेल्वे सेवेला सुरुवात करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. मराठवाडा आणि खान्देश ला जोडणारा हा महत्वकांक्षी रेल्वे मार्ग असून याबाबत मंत्री रावसाहेब दानवे यांनी गांभीर्याने या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे अशी भावना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली.
मंत्री दानवे यांचे चर्चेचे निमंत्रण मुख्यमंत्री पर्यंत पोहचवू
महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांचा विकास साधण्यासाठी रेल्वे विभागाने विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे अशी माहिती देत महाराष्ट्रात नवीन रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी रेल्वेच्या धोरणानुसार राज्य सरकारने जमीन अधिग्रहण करून 50 टक्के शेअर्स द्यावे असे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले. सोबतच यासंदर्भात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी बैठक बोलवावी अशी अपेक्षा मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली.
<span;>या विषयी बोलत असताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, महाराष्ट्रातील रेल्वे सुविधांत वाढ करण्यासाठी केंद्र सरकार जर एक पाऊल पुढे येत असेल तर राज्यसरकार देखील यासाठी सकारात्मक भूमिका घेईल. मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलेल्या चर्चेचे निमंत्रण मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवून याबाबत मुख्यमंत्री जे आदेश देतील त्याची अंमलबजावणी करू असे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
दरम्यान चाळीसगाव - धुळे रेल्वे मेमू रेल्वे दीर्घकालावधीनंतर सुरू झाली. यामुळे प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. रेल्वेला फुलांनी सजविण्यात आले होते. या नवीन गाडीच्या स्वागतासाठी चाळीसगावसह धुळेकरांनी गर्दी केली होती. मेमू रेल्वेला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर मंत्री श्री. सत्तार यांच्यासह रेल्वेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी चाळीसगावपासून भोरस रेल्वेस्थानकापर्यंत प्रवास केला.