अनुभूती शिबिर गणेशवाडी कायगाव येथे संपन्न
औरंगाबाद/ प्रतिनिधी - अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, संभाजीनगर जिल्हा आयोजित अनुभूती शिबिर नुकतेच कायगाव येथे पार पडले. यामध्ये शहरी विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनाचे दर्शन व्हावे, त्यासोबत श्रम संस्काराची जाण व्हावी, स्वतःला ओळखून स्वतःमधील कलागुणांचा विकास झाला पाहिजे, या अनुषंगाने हे तीन दिवसीय शिबिर कायगाव येथे पार पडले.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी अभाविप देवगिरी प्रदेशाच्या प्रदेश मंत्री कु. अंकिता पवार तसेच श्री क्षेत्र रामगड संस्थान चे ह.भ.प.सचिन महाराज व अभाविप संभाजीनगर जिल्हा संयोजक महेश भवर उपस्थित होते.
या शिबिरात अनेक सत्रांचे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये मैदानी खेळ, बौद्धिक खेळ, व्यायाम, व्यक्तीमत्व विकासाच्या दृष्टिकोनातून खेळ व आत्मचिंतन हे सत्र घेण्यात आले. तसेच पथनाट्याच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, हागणदारी मुक्त गाव, व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम या विषयांवर पथनाट्य सादर करून गावात जनजागृती करण्यात आली. श्रमदानाच्या माध्यमातून गावांमध्ये असलेला दीडशे वर्षांपूर्वीचा बारव स्वच्छ करून गावास स्वच्छतेचा संदेश दिला.
समारोप सत्रात अभाविप जिल्हा प्रमुख प्रा.डॉ. सुरेश मुंडे यांनी अभाविप 75 या विषयाची मांडणी केली व संभाजीनगर जिल्हा संघटनमंत्री सचिन लांबुटे यांनी शिबिराचा समारोप केला.शिबिर यशस्वीतेसाठी ओमकार देवरे, निलेश पठाडे, ऋषिकेश केकान, उमाकांत पांचाळ,सोबीया शेख, अभय लांडे, सह अन्य कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.