शिवसेनाप्रमुख असते, तर माझ्यावर ही वेळ आली नसती'; रामदास कदमांचा राजीनामा

शिवसेनाप्रमुख असते, तर माझ्यावर ही वेळ आली नसती'; रामदास कदमांचा राजीनामा

मुंबई: शिवसेनेला (ShivSena) एका मागून एक झटके बसत आहे. गेल्या काही वर्षांपासून पक्षात बाजूला पडलेल्या रामदास कदम (Ramdas Kadma) यांनी अखेर शिवसेना नेते पदाचा राजीनामा दिला आहे. २०१९ पासून पक्षाकडून बाजूला सारल्या गेलेल्या रामदास कदम यांनी राजीनामा देताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची तोफच डागली आहे.

रामदास कदम यांनी राजीनामा देताना काय म्हटलंय?

उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या राजीनामा पत्रात रामदास कदम म्हणतात, "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेतेपदी नियुक्ती केली होती. मात्र, शिवसेना प्रमुखांचं निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहिली नाही, हे मला पाहायला मिळालं."

तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतोय - रामदास कदम

याच पत्रात कदम पुढे म्हणतात, "विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आपण मला अचानक मातोश्रीत बोलावून घेतलं आणि मला आदेश दिले की यापुढे तुमच्यावरती कुणीही कितीही टीका केली किंवा पक्षावर काही बोललं किंवा मातोश्रीवर कोण काही बोललं तरी आपण मीडियासमोर अजिबात जायचे नाही."

 "मीडियासमोर कुठलेही वक्तव्य करायचे नाही. यामागचं कारण मला आजपर्यंत कळू शकलं नाही. मागील ३ वर्षांपासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करीत आहे. ज्या ज्या वेळी शिवसेनेवरती संकटं आली, त्या वाईट काळामध्ये माझा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक याचा साक्षीदार आहे," असं कदम यांनी म्हटलं आहे.

"शिवसेनाप्रमुख असते, तर माझ्यावर ही वेळ आली नसती"

उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या राजीनाम्यात रामदास कदम यांनी म्हटलेलं आहे की, "२०१९ साली आपण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सरकार बनवत होतात, त्याही वेळी मी आपल्याला हात जोडून विनंती केली होती की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर राष्ट्रवादी व काँग्रेससोबत संघर्ष केला आणि हिंदुत्व टिकवलं."

 "राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत युती करू नका, ती बाळासाहेबांच्या विचाराची प्रतारणा होईल, अशी विनंती केली होती. पण आपण त्याही वेळी माझं ऐकलं नाही, याचंही दुःख माझ्या मनामध्ये आहे. शिवसेनाप्रमुख असते, तर माझ्यावर ही वेळ आली नसती आणि म्हणून मी आज 'शिवसेना नेता' या पदाचा राजीनामा देत आहे," असं सांगत रामदास कदम यांनी राजीनामा दिला आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा