चिमुकल्यांच्या स्वागतासाठी शाळा सज्ज

औरंगाबाद /प्रतिनिधी -  कोरोना महामारीमुळे अनेक दिवसांपासून बंद असलेल्या शाळा आज पासून सुरु होणार असल्यामुळे विद्यार्थी व शिक्षकां मध्ये एक वेगळाच उत्साह संचारला आहे. इयत्ता 1 ली ते 7 वी चे  वर्ग आजपासून  सुरू होत आहेत, त्यामुळे मनपा शाळांनी वर्ग सजावट केली असून चिमुकल्यांच्या स्वागतासाठी शाळा आता सज्ज झाल्या आहेत.

गेल्या वर्षी मार्च 2020 पासून कोरोना महामारी मुळे शाळा बंद होत्या. शासनाने नुकताच प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडये यांनी या अगोदर 8 वी ते 12 वी पर्यंत शाळा सुरू केल्या होत्या. तर 20 डिसेंबर सोमवार पासून इयत्ता 1 ते 7 वीचे वर्ग सुरू करण्याच्या आदेशानुसार प्राथमिक व माध्यमिक  शाळा सुरू होत आहेत. यामुळे महानगरपालिकेच्या शाळेने तयारी केली असून,शासनाने कोविड  नियमानुसार  सर्व शाळा व परिसर स्वच्छता औषध फवारणी  करून वर्ग खोल्या सज्ज केल्या आहेत.
मनपा इंदिरा नगर बायजीपूरा येथील शाळेतील मुख्याध्यापक देवेंद्र सोळंके व बालवाडी शिक्षिकांनी  चिमुकल्या मुलांकरिता सर्व वर्गात फुगे,खेळणी,पोस्टर,गोष्टी पुस्तके इतर लहान मुलांच्या खेळण्या व शिक्षणाकरिता सजावट करून चिमकल्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे.आदर्श बालवाडी वर्गअंतर्गत या लहान मुलांच्या स्वागताची तयारी केली असून  गेल्या अनेक महिन्याच्या प्रदीर्घ कालावधी नंतर शालेय शिक्षण सोबत हसत खेळत शिक्षण घेता यावे म्हणून ही तयारी केली असल्याची प्रतिक्रिया शाळेतील शिक्षिका व मुख्याध्यापक यांनी दिल्या आहेत.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा