कोयत्याने मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल
संभाजीनगर /प्रतिनिधी - बिडकीन परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. एका गटाने दुसऱ्या गटावर तलवार, कोयता आणि लोखंडी रॉडने हल्ला केला.
या हल्ल्यात तीनजण जखमी झाले आहेत. या प्रकरणी दोन्ही गटाकडून कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. मात्र या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत काही तरुण बिडकीन येथील कल्याणनगर रस्त्यावर दबा धरून बसल्याचं दिसत आहे. यावेळी घटनास्थळी दोन तरुण दुचाकीवरून दाखल झाले. तेव्हा दबा धरून बसलेल्या गटाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. तलवार, कोयते आणि लोखंडी रॉडने मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी यावेळी दुचाकीवरील तरुणांनी तातडीने दुचाकी घटनास्थळी टाकून पळ काढला आणि समोरच्या दुकानात शिरले.
यानंतर हल्ला झालेल्या तरुणांनी दुकानातून काही लोखंडी रॉड आणि लाकडी दांडा घेत प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी घटनास्थळी असलेल्या लोकांनी दोन गटातील हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही बाजुने बाचाबाची झाली. यावेळी संतापलेला एक तरुण कोयत्याने दुसऱ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र समोरील तरुणाने हे वार हुकवले, यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. काही वेळ बाचाबाची आणि शिवीगाळ झाल्यानंतर दोन्ही गट शांत झाले, ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमपुरी गावातील जागेच्या वादातून दोन गटांत हा राडा झाला आहे. दोन्ही गटात मागच्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. गुरुवारी हा वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. मात्र अद्याप दोन्ही गटाच्या वतीने गुन्हा दाखल झाला नसल्याची पोलिसांची माहिती. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.