डॉक्टरनेच केले रुग्णासोबत गैरकृत्य

डॉक्टरनेच केले रुग्णासोबत गैरकृत्य

पुणे / प्रतिनिधी  -  पुणे शहरातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. इथे एका डॉक्टरनेच त्याच्याकडे उपचारासाठी आलेल्या महिलेवर वारंवार बलात्कार केला आहे. पुण्यातील मांगडेवाडी कात्रज परिसरातील एका क्लिनिकमध्ये हा संतापजनक प्रकार घडला. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी डॉक्टराला अटक केली आहे.

डॉ. अमित आनंदराव दबडे असे या नराधम डॉक्टराचं नाव आहे. मागील दीड वर्षांपासून म्हणजेच १ जुलै २०२२ पासून हा प्रकार घडत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. हा प्रकार वाढत गेल्याने पोलिसांकडे तिने धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉक्टर अमित दबडे याचे कात्रज परिसरात मांगडेवाडी या ठिकाणी क्लिनिक आहे.

सदर क्लिनिकमध्ये तपासणी करण्याकरीता ३२ वर्षीय पीडित महिला आल्यानंतर त्याची तिच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर डॉक्टरने महिलेचा मोबाईल क्रमांक घेऊन तिला मोबाईल फोनवर मेसेज आणि कॉल करून तिच्याशी गोड गोड बोलून त्याच्या हॉस्पिटलमध्ये बोलवून घेतले. त्यानंतर तिचा हात धरून  तिच्यासोबत गैरकृत्य केलं.

नराधम डॉक्टर इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने या प्रकाराबाबत माफी मागण्याच्या बहाण्याने तिला क्लिनिकमध्ये बोलावलं. त्यानंतर पीडितेला त्याने कमरेत इंजेक्शन देण्याच्या बहाण्याने  कुणी नसल्याची संधी साधत  पीडितेवर बलात्कार  केला.

काही दिवस महिलेची इच्छा नसताना तिचा वारंवार पाठलाग करून तिला डॉक्टरने त्रास दिला. अखेर याबाबत महिलेने पोलिसांकडे धाव घेत, डॉक्टर विरोधात तक्रार दाखल केली. या प्रकारानंतर पोलिसांनी  डॉक्टरांवर थेट कारवाई केली आहे. दवाखान्यातून डॉक्टराला अटक केली आहे. डॉक्टरने केलेल्या कृत्यामुळे सगळीकडून संताप व्यक्त केला जात आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा