प्राजक्ता माळी बातम्यांच्या प्रिंटची साडी परिधान केल्याने ट्रोल, म्हणाली...
मुंबई: मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. प्राजक्ता ही ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून घराघरात पोहोचली. प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. नुकतंच प्राजक्ताने एक फोटोशूट केले आहे. या फोटोशूटच्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
प्राजक्ता ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसते. गेल्या काही दिवसांपासून ती रानबाजार या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. नुकतंच तिने एक फोटो शेअर केले आहेत. यात तिने एक साडी परिधान केली आहे. या साडीत विविध इंग्रजी बातम्या प्रिंट केलेल्या आहेत. यापूर्वीही तिने या साडीतील फोटोशूटचे फोटो शेअर केले होते. याला कॅप्शन देताना “पॅरिसमधील संध्याकाळ, (ही साडी समर कलेक्शनची आहे, फोटो पोस्ट करता करता पावसाळा उजाडला…असो, दुसऱ्या उन्हाळ्यासाठी बघून ठेवा)”, असे तिने म्हटले होते. त्यामुळे तिला ट्रोल करण्यात आलं होतं.
त्यानंतर आता तिने पुन्हा एकदा या साडीतील काही खास फोटो शेअर केले आहेत. त्याला तिने खास कॅप्शन दिले आहे. “आजच्या ठळक बातम्या-माळी टाईम्स. (आजचं कॅप्शन परवाच्या कमेंट्समधून ढापलेलं आहे. म्हणून बातम्या इंग्रजीतून असल्या तरी नाव- मथळा मराठीत आहे.) असे तिने या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
प्राजक्ता माळीची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. यावर तिच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. ‘आजची ठळक बातमी खूपच आवडली’, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. तर एकाने ‘पेपर सोबतची “पुरवणी” कुठंय…. #प्राजु’ असे एकाने कमेंट करताना म्हटले आहे. त्यासोबत एकाने ‘Breaking news: रद्दीचा भाव गगनाला भिडला’ अशी कमेंट केली आहे.
प्राजक्ता ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. काही दिवसांपासून ती रानबाजार या वेबसीरिजमुळे चर्चेत आली होती. यानंतर ती कंट्रोल एन प्रॉडक्शन निर्मित वाय चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाची कथा अजित सुर्यकांत वाडीकर यांची आहे. तर या चित्रपटाची पटकथा आणि संवाद अजित वाडीकर, स्वप्नील सोज्वळ आणि संदीप दंडवते यांनी लिहिलेले आहेत.