एसटीबसचे चाक अचानक निखळले प्रवाशांची प्रशासनावर तीव्र नाराजी
दररोज, या ना त्या कारणाने चर्चेत असलेले एसटी महामंडळ वज्रेश्वरी-वसई मार्गावर एसटी बसला झालेल्या विचित्र अपघातामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
मीरा भाईंदर येथील वज्रेश्वरी- वसई मार्गावर एका भरधाव एसटी बसचं चाक अचानक निखळल्याची घटना घडली आहे. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी 30 प्रवासी बसमधून प्रवास करत होते.
बसचं चाक निखळल्यानंतर बसचालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेचा धडकी भरवणारा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
एसटी बस वज्रेश्वरीहून वसईकडे जात होती. भरधाव वेगाने जात असताना पारोळ गावाजवळ शनिवारी दुपारी अचानक बसचं पुढील चाक निखळलं. चाक सुटल्याने बस डळमळू लागली आणि प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. काही क्षणांसाठी बसचे नियंत्रण सुटण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, चालकाने तातडीने रस्त्याच्या बाजुला घेत ब्रेक मारला. चालकाने बस थांबवत सर्वांना सुरक्षित बाहेर काढले.
बसचं चाक निखळल्यानंतर जवळपास 20 ते 25 मीटर बस पुढे घासत गेले. ज्यावेळी अपघात झाला, त्याचवेळी समोरून एक ट्रक देखील आला होता. चालकाला बस नियंत्रित झाली नसती तर मोठा अनर्थ घडला असता. या घटनेनंतर प्रवाशांनी एसटी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जुन्या आणि धोकादायक बस हटवून नव्या आणि सुरक्षित बसगाड्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली गेली. प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी प्रवाशांकडून करण्यात आली.
परिवहन मंत्र्यांच्या दाव्याचं काय
राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी एमएसआरटीसीचा कारभार हाती घेताच मोठ्या थाटात अधिकाऱ्यांकडून आढावा वैगैरे घेतला. यामध्ये पुढील 100 दिवसांमध्ये करावयाच्या बाबींवरही चर्चा झाली . इतकेच नव्हे तर एसटीचे रुपडे पालण्याचे ठरवून आगामी काळात मोठे बदल करण्याचे आणि दरवर्षी जवळपास 5000 नवीन बस खरेदी करणार असे राज्य सरकारचे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात मात्र, अद्याप काहीही बदल झाले नाहीत. नागरिकांना त्याच पत्र्याच्या जुन्या बसने प्रवास करावा लागत आहे. या बस कधी रस्त्यात मध्येच बंद पडतात. कधी मर्यादित बससंख्या असल्याने मार्गावर बसच उपलब्ध नसते. तर कधी पुरेसे प्रशिक्षण नसलेल्या चालकांच्या हातात बस मिळाल्याने अपघाताच्या घटना घडतात. वज्रेश्वरी वसई मार्गावर घडलेली घटना तर संतापजनकच आहे. रस्त्यावरुन धावणाऱ्या बसचे चाक अचानक निखळले आहे. चालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवत बस नियंत्रित केली म्हणून, पुढील अनर्थ टळला. अन्यथा, मोठी दुर्घटना घडू शकली असती. त्यामुळे मंत्री सरनाईक यांनी घेतलेला आढावा केवळ नावाला होता का? असे बोलले जात आहे.