तर मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!
औरंगाबाद/प्रतिनिधी -राजधानीत दस्तुरखुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वरदहस्ताने आणि अनिल परब यांच्या सहकार्याने मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचा सनसनाटी दावा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शुक्रवारी केला. वारंवार तक्रारी करून देखील राज्य सरकार, बीएमसी कानाडोळा करते.अशात पावसाळ्यात धोकादायक अवस्थेतील इमारती पडून मनुष्यहानी झाली तर यासाठी सर्वस्वी मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
कुर्ला जॉडिशन येथील एल-वॉर्डमध्ये बेकायदेशीर आणि धोकदायक इमारतींचे बांधकाम करण्यात आले आहे. ही बाब अतिशय गंभीर असून याकडे तात्काळ लक्ष घातले नाही तर शेकडो निरपराध नागरिकांचे नाहक जीव जाण्याचा धोका आहे, असा दावा त्यांनी केला आहे. यासंबंधी पाटील यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त तसेच मुंबई पोलीस आयुक्त यांना पत्र पाठवून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या ठिकाणी जवळपास ५ ते ६ बेकायदेशीर इमारती बांधण्यात आल्या आहे. संबंधित व्यावसायिकांनी सरकारच्या विविध विभागाकडून सामान्य अधिकृतता आणि परवानग्या देखील पुर्ण केलेेल्या नसल्याचा आरोप पाटील यांनी केला. मुंबईत अशा अनेक बेकायदेशीर इमारती आहेत. या धोकादायक तसेच बेकायदेशीर इमारतीबाबत वारंवार तक्रारी करून देखील बीएमसी कडून कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.
शहरात जवळपास २ हजार ३४० इमारती धोकादायक स्थितीत आहे. परंतु, या इमारतींच्या डागडुजीच्या नावाखाली अधिकारी भ्रष्टाचार करीत आहेत.अशा इमारतींवर कारवाई करण्यास पथक गेले तर त्यांना पोलीस संरक्षण पुरवले जात नाही.त्यामुळे कारवाई थंडबस्त्यात पडते, असा दावा पाटील यांनी केला आहे. त्यामुळे पावसाळ्यात जर काही इमारती कोसळून मनुष्यहानी झाली तर यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पाटील यांनी केली.</span;></span;></span;></span;>