फुले-आंबेडकरी चळवळीत बुद्धिप्रिय कबीरांची पोकळी जाणवते- मिलिंद दाभाडे
छत्रपती संभाजीनगर /प्रतिनिधी - प्रतिगामी शक्तीने डोके वर काढले आहे. अशा स्थितीत लढवय्ये कार्यकर्ते हवे असतात. पण बुद्धप्रिय कबीर यांच्या निधनामुळे फुले-आंबेडकरी चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. असे मत मनपाचे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद दाभाडे यांनी व्यक्त केले आहे. सामाजिक कार्यकर्ते कबीर यांच्या 3 ऱ्या स्मृतीदिनानिमित्त शनिवार दि. २५ मार्च बुद्ध लेणी येथे अभिवादन सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ॲड. अभय टाकसाळ होते. दाभाडे म्हणाले, ‘ बुद्धप्रियने निष्ठावान, प्रामाणिक, धडाडीचा आणि पूर्णवेळ कार्यकर्ता कसा असतो, याचा आदर्श समाजासमोर ठेवला. आज असे कार्यकर्ते भेटणे दुरापास्त झाले आहे. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने कबीरपासून धडा घेतला पाहिजे. विद्यार्थी चळवळीत त्यांनी प्रचंड योगदान दिले आहे. नागसेन वन बचाव आंदोलन त्यांनी हाती घेतले होते. आता त्यांच्या स्मरणार्थ पीईएसचे डॉ. आंबेडकर लॉ कॉलेज ते जुबली पार्कच्या रस्त्याला नाव दिले जाईल. मनपाच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत तसा ठराव मंजूर करून घेतला जाईल. त्यांच्या नावाने पूर्णवेळ कार्यकर्त्याला दरवर्षी एक पुरस्कार दिला जाईल.’ असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. प्रा. भारत शिरसाट यांनीही मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करताना टाकसाळ म्हणाले, ‘ लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. राहुल गांधी यांच्या खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. ईव्हीएमच्या विरोधात विरोधी पक्ष एकत्र येत आहे. एवढी अनागोंदी सुरू असताना कबीर यांची उणीव भासते. त्यांनी नक्कीच याविरोधात तीव्र लढा उभा केला असता..!’ असा आशावादही टाकसाळ यांनी व्यक्त केला. मी गमावून बसलोय
सुख जिंकण्याची बाजी
मी माती झटकून उठलेला
माणूस आहे
मी कित्येकदा
लावलाय गळफास
मी मरन जवळून पाहिलेला
माणूस आहे
मला कोणीच समजून
घेणार नाही
मी कुणाला समजून सुध्दा
येणार नाही
येथे वाहणारा वारा
आणि
धावणारी माणसे राहतात
मी जमिनी खालून रांगणारा
माणूस आहे
या समर्पक कवितेने कवी व प्रगतीशील लेखक संघाचे मराठवाडा संघटक सुनिल उबाळे यांनी आदरांजली वाहीली, अभिवादन सभेला प्रज्ञा प्रसार धम्म संस्कार केंद्राचे भदंत नागसेन थेरो, राधाकिशन पंडित, अमोल घोबले, बुद्धभूषण जाधव , कीशोर म्हस्के, राजु हिवराळे आदींची उपस्तिथी होती. मुकुल निकाळजे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.