आजारी मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या तिघांचा अपघातात मृत्यू

टेम्पो ने कारला जोरदार धडक दिल्यामुळे आजारी मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात ढोकीजवळ झाला असून टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मित्राला पाहण्यासाठी तीन मित्र पुण्याहून निघाले होते. मात्र मित्रांच्या कारला ढोकीजवळ आयशर टेम्पोने धडक दिली. यात कारमधील तिघांचाही मृत्यू झाला. दुर्दैवाची बाब म्हणजे ज्या आजारी मित्राला पाहण्यासाठी हे तिघे निघाले होते त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
चौघेही लातूरच्या रेणापूर तालुक्यातील कामखेडा येथील रहिवासी होते. यामुळे कामखेडा गावावर शोककळा पसरली आहे. कामखेडा येथील रहिवासी असलेले लिंबराज वाघमारे (वय 36 वर्षे) यांचा पुणे येथे चप्पल बनवण्याचा कारखाना होता. परंतु काही दिवसापूर्वी ते आजारी पडल्यामुळे ते गावी येऊन लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते.
तर केशव वाघमारे, नितीन जटाळ, राम सुरवसे हे पुणे येथे वेगवेगळे व्यवसाय करत होते. त्यात केशव वाघमारे यांचा पुणे येथे चप्पल बनवण्याचा कारखाना होता. तर नितीन जटाळ यांचं लातूरमध्ये साई हॉटेल होतं. तर राम सुरवसे यांचं पुणे येथे सलूनचे दुकान होते.
आपल्या आजारी पडलेल्या मित्राला पाहण्यासाठी हे पुण्यावरून लातूरच्या दिशेने निघाले. मात्र वाटेतच त्यांना मृत्यूने गाठलं. तर मित्रांची भेट न झालेल्या लिंबराज यांचंही उपचारदरम्यान रुग्णालयात निधन झालं.या दुर्दैवी घटनेने चारही मित्रांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. याप्रकरणी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.