औरंगाबादकरांनो सावधान शहरात ओमिक्रॉनचा शिरकाव

औरंगाबादकरांनो सावधान शहरात ओमिक्रॉनचा शिरकाव

औरंगाबाद /प्रतिनिधी - शहरात ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. लंडन आणि दुबई येथून आलेल्या दोघा जणांचा जिनोम सिक्वेन्सिंग अहवाल पॉझिटिव्ह आला आहे . त्यामुळे शहरात ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाला असल्याचे मनपा आरोग्य विभागाने  सांगितले आहे.

ओमायक्रॉन या कोरोना विषाणू संसर्गाच्या नवीन व्हेरियंटची धास्ती संपूर्ण देशाने घेतली आहे. ओमायक्रॉनबाधितांची संख्या रोज वाढतच आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून आले. त्यात औरंगाबादेतही कोरोनाचा नवा  व्हेरियंट दाखल झाला आहे.
औरंगाबादेतील रहिवासी असलेले एक कुटुंब इंग्लंडमध्ये स्थायिक झाले आहे. त्यांच्याच जवळच्या नातेवाईंच्या घरी लग्न समारंभाचे आयोजन पुणे येथे करण्यात आले होते. लग्नाला  उपस्थित राहण्यासाठी हे कुटुंब १४ डिसेंबर रोजी इंग्लंडहून मुंबईत दाखल झाले. मुंबई विमानतळावर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत कुटुंबातील एक मुलगी (२१) पॉझिटिव्ह आढळून आली. त्यामुळे तिला मुबंईतच एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिचा जिनोम सिक्वेंसिंगचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. त्या कुटुंबातील अन्य तीन सदस्यांचे (आई-वडील आणि लहान बहीण) कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे आई आणि लहान बहीण औरंगाबाद ला आले. इथे आल्यावर त्या दोघीही एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन झाल्या. वडील मात्र मोठ्या मुलीसोबत मुंबईतच थांबले होते. मुंबईहून औरंगाबादला आलेल्या दोघींची विचारपूस करण्यासाठी त्या मुलीचे वडील  रविवार, १९ डिसेंबर रोजी शहरात आले होते. ते शहरात  येताच त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्याला पाठविण्यात आला होता. सहा दिवसांनी आज शनिवार, २५ रोजी त्यांचा जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
तसेच दुबई येथून आलेला एक व्यक्ती सिडको भागा मधील रहिवासी आहे. हा व्यक्ती देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे जिनोम सिक्वेन्सिंगसाठी अहवाल पूण्याला पाठविण्यात आला होता. त्या व्यक्तीच्याही जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शहरात दोघांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यांच्या नातेवाईकांची व संपर्कातील व्यक्तींची कोरोना चाचणी केली जात असल्याचे मनपा आरोग्य विभागाने  सांगितले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा