ईडीची कारवाई - प्रताप सरनाईक यांची 11 कोटींची मालमत्ता जप्त
मुंबई / प्रतिनिधी : शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. पीएमएलए ॲक्ट अंतर्गत त्यांची प्रॉपर्टी जप्त करण्यात आली आहे. सरनाईक यांची 11 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
ईडीने ठाण्यातील सरनाईक यांच्या दोन फ्लॅट आणि मालमत्ता पीएमएलए अॅक्ट अंतर्गत जप्त केली, असून याची किंमत 11.35 कोटी आहे. आतापर्यंत शिवसेनेच्या चार नेत्यांना ईडी चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं. तसंच संजय राऊतांच्या कुटुंबीयांच्या मागे देखील ईडी चौकशीचा फेरा लागला आहे. सध्या शिवसेनेचे चार नेते ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. यामध्ये मंत्री अनिल परब, आनंदराव अडसूळ, प्रताप सरनाईक आणि खासदार भावना गवळींच्या समावेश आहे.
गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये शिवसेनेच्या नेत्यांवर ईडीकडून कारवाई सुरु आहे. यामध्ये नेत्यांचे नातेवाईक, त्यांच्याशी संबंधीत कंपन्या आणि इतर मालमत्तांची चौकशी केली जातेय. ईडीने २२ मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नातेवाईकावर कारवाई केली आहे. ईडीने ठाकरेंच्या मेहुण्याची ६ कोटींपेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता जप्त केली आहे. पुष्पक बुलियन प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. 'नीलांबरी' प्रकल्पातील ११ सदनिका हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालकीच्या आहेत. श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरेंचे भाऊ आणि उद्धव ठाकरेंचे मेहुणे आहेत. यापूर्वी मनी लाँडरींगप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच मालमत्तेवर ईडीने कारवाई झाली आहे. त्यानंतर आता सरनाईक यांच्या मालमत्ता देखील जप्त करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, ठाणे महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामाचा ठपका ठेवत प्रताप सरनाईक यांच्या कंपनीला तीन कोटी 33 लाख दंड ठोठावला होता. यापैकी या कंपनीने 25 लाखांची रक्कम महापालिकेकडे जमा करण्यात आली होती. उर्वरित तीन कोटी आठ लाखांची रक्कम व त्यावरील 18 टक्के दराने व्याजाची एक कोटी 25 लाखांची रक्कम सरनाईक यांच्याकडून बाकी होती. मात्र एकूण 21 कोटी रक्कम होत असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलाय.