अनैतिक संबंधातून पत्नीने केली पतीची हत्या
पत्नी, प्रियकरासह चालकाला अटक
औरंगाबाद : इंस्टाग्रामवर सूत जुळलेल्या पत्नीने प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. तीन दिवसांपूर्वीच पैठण तालुक्यातील हर्षी शिवारात मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळून आला होता. स्थानिक गुन्हे शाखा आणि पाचोड पोलिसांनी मयताच्या जवळ मिळालेल्या साडी सेंटरची कॅरीबॅग आणि पाण्याच्या बाटलीवरून मयताची ओळख पटवून मारेकऱ्यांपर्यंत पोहचुन त्यांना बेड्या ठोकल्या. देविदास रामभाऊ जाधव (४५, रा. वरुड रोड, शेवगाव, जि. अहमदनगर) असे हत्या करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी जाधव यांची दुसरी पत्नी सुरेखा तिचा प्रियकर आशिष विजय राऊत ( २६,रा. सावळी. जि.यवमाळ) आणि वाहन चालक संगीत शामराव देवकते (२५, रा.सावळी जि.यवमाळ) या तिघांन स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांसह पाचोड पोलिसांनी नागपूर येथून शनिवारी (दि.२१) पहाटे अटक करून पाचोड पोलिसांच्या ताब्यात दिले अशी माहिती शनिवारी पोलीस अधीक्षक मनीष कलवानीया यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पाचोड-पैठण रस्तापासून १०० मिटर अंतरावरील थेरगाव-हर्षी परिसरातील गाढेकर व उबाळे वस्तीवर जाणाऱ्या शीव रस्ताच्या कडेला नालीत एका व्यक्तीचा मृतदेह ब्लॅंकेट गुंडाळून जाळून फेकल्याचे समोर आले होते. यावेळीच हा घातपात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. स्थानिक गुन्हे शाखेसह पाचोड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. मयताच्या जवळ मिळालेल्या साडी सेंटरच्या कॅरीबॅग आणि पाण्याच्या बाटलीवर शेवगाव, जि. अहमदनगरचा उल्लेख होता. त्यामुळे पोलिसांनी शेवगावचा परिसर पिंजून काढला. गोपनीय बातमीदार आणि स्थानिक लोकांच्या चौकशीत मयत हा इलेक्ट्रिशियन देविदास जाधव असलयाचे निष्पन्न झाले. जाधव यांचे पहिले लग्न झाले असून पहिल्या पत्नीकडून त्यांना दोन मुली देखील आहेत. मात्र काही दिवसांनी त्यांच्यात वाद झाला आणि पहिली पत्नी जाधव यांना सोडून गेली. त्यानंतर त्यांनी काही दिवसांनी दुसरी पत्नी सुरेखासोबत लग्न केले. लग्नानंतर दोघेही बरेच दिवस चांगले राहिले. मात्र, नंतर सुरेखाचे दीड वर्षापूर्वी इंस्टाग्रामवर यवतमाळ जिल्ह्यातील आशिष राऊत यांच्याशी ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यामुळे घरात सतत वाद सुरु होता. त्यात जाधव हा सुरेखाला मारहाण करायचा. हे सर्व सुरेखा तिचा प्रियकर आशिष याला सांगायची. दोघे अनेकवेळा भेटले होते. त्यामुळे त्यांचे चांगलेच सूत जुळलेले होते. दोघांनी जाधव यांना पतीला संपवायचा निश्चय केला. जाधव घरात झोपलेले असताना पत्नी सुरेखाने प्रियकर आशिषला बोलवून घेतले. आशिष हा त्याचा कार (एमएच-१२-जीएफ-१५२७) चालक मित्र संगीत देवकते याला सोबत घेऊन शेवगावला आला होता. दोघांनी जाधव हे झोपीत असतानाच पत्नी सुरेखा यांनी लोखंडी रॉडने जाधव यांचा खून केला. त्यानंतर जाधव यांचा मृतदेह संगीत याने आणलेल्या कारमध्ये टाकूनपाचोड हद्दीतील हर्षी शिवारात आणला. तिथे ओळख पटू नये म्हणून पेट्रोल टाकून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र घटनास्थळी आढळून आलेल्या पाणी बाँटल व कँरिबँगवरून स्थानिक गुन्हे शाखेसह पाचोड पोलिसांनी खुनाचा उलगडा केला. नागपूर व यवतमाळ येथून आरोपीला अटक केली . या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यांत झालेली असुन पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सुरेश माळी हे करीत आहेत.
हि कारवाई पोलीस अधीक्षक मनीष कलवानीया ,उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रामेश्वर रेगे, पाचोड ठाण्याचे सहायक निरीक्षक गणेश सुरवसे, उपनिरीक्षक विजय जाधव, प्रदीप ठुबे, श्रीमंत भालेराव, बालू पाथ्रीकर, वाल्मिक निकम, रजनी सोनवणे, आनंद घाटेश्वर, ज्ञानेश्वर मेटे, योगेश तरमाळे, जीवन घोलप यांनी परिश्रम घेतले.