काशी येथील श्री. मुर्डेश्वर मठाच्या विकासासाठी सर्वोतोपरी मदत करू - राज्यमंत्री अब्दुल सत्तार
सिल्लोड /प्रतिनिधी- काशी विश्वनाथ येथे श्री. मुर्डेश्वर संस्थांनचे पिठाधिश असलेल्या श्वासानंद मठाच्या जीर्णोद्धार व अद्यावतीकरणासाठी समिती स्थापन करून नियोजनबद्ध आराखडा तयार करा यासाठी सर्वोतोपरी मदत करू अशी ग्वाही महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केळगाव येथे दिली.
केळगाव ता. सिल्लोड येथील बद्रीनाथ कोठाळे यांच्या नवीन घराच्या वस्तुशांती निमित्ताने ह.भ.प. पुरूषोत्तम महाराज बावस्कर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह श्री. मुर्डेश्वर संस्थानचे पिठाधिश ओंकारगिरी महाराज, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, जि. प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, डॉ. संजय जामकर, डॉ. मॅचिंद्र पाखरे, बाजार समितीचे संचालक दामूअण्णा गव्हाणे, सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे, कृष्णा लहाने, माणिक महाराज शेळके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करीत असतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मागील आठवड्यात काशी येथे जावून तेथील श्वासानंद मठास भेट दिल्याची माहिती दिली. या भेटी दरम्यान तेथील कै. काशीगिरी महाराज यांची प्रतिमा पाहून प्रत्येक जण भावून होतो असे स्पष्ट करीत श्री. मुर्डेश्वर संस्थानचे पिठाधिश हे या आश्रमाचे पदसिद्ध पिठाधिश असल्याची माहिती तेथील व्यवस्थापकांनी दिली. त्यामुळे ओंकारगिरी महाराज यांनी लवकरच काशी येथील मठाचे सूत्र हाती घ्यावेत असे मत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.