घाटीतील पारिचारीकांचे राज्यव्यापी आंदोलन
संभाजीनगर/ प्रतिनिधी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे गुरुवारी पारिचारीकांनी विविध मागण्यासाठी आंदोलन केले.
या आंदोलनात महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा इंदूमती थोरात, शासकीय परिचारिका संघटना, छत्रपती संभाजीनगरच्या अध्यक्ष शुभमंगल भक्त, द्रोपदी कर्डिले, महेंद्र सावळे, प्रतिभा अंधारे, कालिंदी इधाटे, वंदना कोळनुरकर, प्रवीण व्यवहारे, नवाज सय्यद आदीसह परिचारकांचा सहभाग होता.
पदोन्नती ही सेवाजेष्ठतेच्या आधारेच काढावी ही संघटनेची आग्रही भूमिका आहे. संघटनेतर्फे अनेक वर्षांपासून या पदाच्या पदोन्नतीसाठी पत्रव्यवहार तसेच बैठकीद्वारे चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला असूनही सदर पदोन्नत्या प्रलंबितच आहेत. त्यामुळे परिचारिका वर्गामध्ये संतप्त भावना निर्माण झालेल्या आहेत. अखेर परिचारिकांना न्याय देण्यासाठी आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात आला असून लाडक्या बहिणींना न्याय देण्यांची मागणी केली आहे.
परिचर्या संवर्गाच्या सर्वंकष पदोन्नती ही महत्त्वाची मागणी आहेच तसेच परिचारिकांना मिळणारे भत्ते विशेषतः परिचर्या भत्ता, ग्रामीण रुग्णालयातील परिसेविका पद पुनर्जीवित करणे, बंधपत्रित परिचारिकांचा सेवा कालावधी नियमित करणे, बक्षी समिती खंड-२ मध्ये परिचर्या संवर्गावर झालेला अन्याय दूर करणे, परिविक्षा कालावधीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेमधून अधिपरिचारिका पद वगळावे या आणि इतर अनेक जिव्हाळ्याच्या मागण्या निवेदनात मांडल्या गेल्या आहेत.