राज्यपालांची स्क्रिष्ट दिल्लीतून येते की मुंबईतून याचा शोध घेतला पाहिजे – उध्दव ठाकरे

राज्यपालांची स्क्रिष्ट दिल्लीतून येते की मुंबईतून याचा शोध घेतला पाहिजे – उध्दव ठाकरे

मुंबई:  मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते. यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. राज्यपालांचं हे पार्सल परत पाठवायला हवं, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच राज्यापालांच्या भाषणाची स्क्रिप्ट दिल्लीतून येते मुंबईतून असा प्रश्न उपस्थित करत भाजपादेखील चिमटा काढला.

“राज्यपालांचं हे विधान अनावधानाने आलेलं नाही. काहीवेळा आपले राज्यपाल फार तत्परतेने काम करताना दिसतात. तर काही ठिकाणी मात्र अजगराप्रमाणे सुस्त बसलेले असतात. यापूर्वीही सावित्रीबाई फुलेंबाबत यांनी हिणकस असं विधान केलं होतं. आता मुंबईबद्दल बोलून त्यांनी मराठी जनतेचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांची स्क्रिष्ट दिल्लीतून येते की मुंबईतून याचा शोध घेतला पाहिजे”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली.

 “आज राज्यपालांनी कहर केला आहे. मुंबईला गौरवशाली इतिहास आहे. मुंबई, मराठी माणसाची ओळख जगभरात आहे. यांचं गांभीर्य महाराष्ट्राचं राज्यपाल पद भूषवणाऱ्या व्यक्तीला नाही, याची खंत आहे. ही मुंबई कोश्यारी यांनी आंदण दिलेली नाही. मराठी माणसाने मेहनतीने घेतलेली आहे. त्यामुळे राज्यपालांचं हे पार्सल परत करायला हवं”, असं ते म्हणाले.

 शुक्रवारी (२९ जुलै) जे.पी. रोड, अंधेरी (प) मुंबई येथील दाऊद बाग जंक्शन येथील चौकाचा नामकरण व उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी बोलताना, “कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही.”, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले होते.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा