संशोधनाभिमूख शिक्षण ही काळाची गरज- कुलगुरू डॉ. विलास सपकाळ

संशोधनाभिमूख शिक्षण ही काळाची गरज- कुलगुरू डॉ. विलास सपकाळ

एमजीएम विद्यापीठात एकदिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

औरंगाबाद / प्रतिनिधी : आपण सध्या शिक्षणाच्या नव्या वास्तुशास्त्राकडे वळत आहोत. विद्यार्थी केंद्रीत, संशोधनाभिमूख, तंत्रज्ञानाधारीत शिक्षण ही काळाची गरज आहे. ज्ञानाची कोणतीच शाखा ही स्वतंत्र नसते तर ती कायमच इतर शाखांशी संलग्नित असते. सध्याचे शिक्षण हे बहुशाखीय आहे. त्यामुळे आताच्या काळात ज्ञानाचे संपत्तीत रुपांतर व्हायला हवे, अशी भावना एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी व्यक्त केली. 
        एमजीएम विद्यापीठाच्या भारतीय आणि विदेशी भाषा विभागाच्या वतीने 'भाषा, साहित्य, सामाजिक शास्रे आणि शारीरिक शिक्षणातील नवप्रवाह' या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. या वेळी एमजीएम विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी बीसीयूडी संचालक तथा इंग्रजी साहित्याचे अभ्यासक डॉ. ए. जी. खान अध्यक्षस्थानी होते, तर बीजभाषक म्हणून अहमदनगर महाविद्यालयातील इंग्रजी विभागप्रमुख प्रा. कमलाकर भट आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील माजी समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. स्मिता अवचार यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, मानव्य विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके, चर्च सत्राच्या आयोजक तथा भारतीय आणि विदेशी भाषा संस्था संचालक डॉ. रश्मी आचमरे यांची उपस्थिती होती. 
      याप्रसंगी बीजभाषकांनी कोविड-19 काळातील जागतिक उलथापालथ तसेच भारतीय नव्या शिक्षण धोरणाने उपस्थित झालेले नवे संकट यासह भयव्याकूळ वर्तमानवर भाष्य करत संशोधनातील नवप्रवाह मांडले. तसेच यूजीसीच्या संशोधन फेलोशिप धोरणात बदल करून जास्तीत जास्त संशोधकांना फेलोशिप मिळालीच पाहिजे, तरच संशोधनास गती मिळेल, असे मत व्यक्त केले.  
       डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील उर्दू विभागाच्या सेवानिवृत्त प्रा. डॉ. मसरत फिरदोस यांना महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमीच्या  देण्यात येणारा 2019 चा विद्यापीठ स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. 
    या परिषदेच्या विविध चार सत्रांमध्ये देशभरातून आलेल्या संशोधकांनी आपले शोधनिबंध सादर केले. परीक्षक म्हणून प्रा. डॉ.ज्ञानोबा मुंढे, प्रा. डॉ. सुरेखा मराठे, प्रा. डॉ. पी. एम. कल्याणकर, प्रा. डॉ.प्रा. डॉ. मसरत फिरदोस, प्रा. डॉ. अजय देशमुख यांनी काम पाहिले. याप्रसंगी भारतीय आणि विदेशी भाषा संस्थेच्या बीएच्या आणि बीएएमसीजेच्या ज्ञानेश्वर टाले याने वाचलेल्या शोधनिबंधांनी विशेष वाहवा मिळवली. 
        समारोप सत्रात इंग्रजी साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. मुस्तजीब खान यांची प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी मानसशास्त्रज्ञ डॉ. सुरेखा मराठे होत्या. याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. मुस्तजीब खान आणि जगभरात संशोधकांची होत असलेली मुस्कटदाबी विविध उदाहरणातून मांडली. तसेच संशोधनातील नवप्रवाह विशद करताना समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देणाऱ्या  मौलिक संशोधनाची गरज व्यक्त केली.  यावेळी आयोजक डॉ. रश्मी आचमारे  यांनी अहवाल वाचन केले. सूत्रसंचालन हिंदी विभागप्रमुख,  कवयित्री डॉ. शहनाज बासमेह यांनी केले, तर आभार मराठी विभागप्रमुख डॉ. राम गायकवाड आणि उर्दू विभागप्रमुख डॉ. अस्वद गौहर यांनी  मानले. यशस्वितेसाठी प्रा. डॉ. बाळासाहेब सराटे, प्रा. डॉ. रेहाना सय्यद, प्रा. डॉ. बालाजी दामावले, प्रा. डॉ. वैशाली चौधरी, प्रा. डॉ. अविनाश गोरे, प्रा. डॉ. दिनेश वंजारे, धोंडीराम बामनीकर यांनी प्रयत्न केले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा