जावयाने केला सासऱ्याचा खून

जावयाने केला सासऱ्याचा खून

संभाजीनगर /प्रतिनिधी - चिखल ठाण्यातील धनगर गल्लीत  शनिवार (दि. २) रात्री साडेनऊ वाजता  सासऱ्यांची माफी मागायला आलेल्या जावयाने पोटात चाकू खुपसून सासऱ्याचा खून केला. घटनेनंतर जावई तेथून पळून गेला.     
या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संशयित जावयाला आज (दि.३) अटक केली आहे. या प्रकरणी मृताचा मुलगा योगेश रिठे (वय २९) यांनी एमआयडीसी सिडको ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

सूर्यभान फकिरचंद रिठे (वय ५२, रा. धनगर गल्ली, चिखल ठाणा) असे मृत सासऱ्याचे तर दत्ता रामराव पाटोळे (३६, रा. पिरबावडा, ता. फुलंब्री) असे जावयाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, योगेशला चार बहिणी आहेत. त्यातील सुनिता हिचा १४ वर्षांपूर्वी दत्ता पाटोळे याच्याशी विवाह झाला आहे. त्यांना दोन मुले, एक मुलगी आहे. दत्ता हा ट्रॅव्हल्स बसवर चालक आहे. दरम्यान, दत्ता दारू पिवून सुनिताला त्रास द्यायचा. त्याच्यामुळे त्रस्त सुनिता दीड महिन्यापूर्वी माहेरी गेली. तिने मुलीला सोबत नेले. दोन मुले मात्र दत्ताकडेच राहत होती. त्यांच्यातील वादाची तक्रार महिला निवारण केंद्रातही केली होती. मात्र, तेथील सुनावणीला दत्ता गैरहजर राहायचा.

काही दिवासांपूर्वी दत्ताने सासू- सासऱ्यांना शिवीगाळ केली होती. त्याबाबत बोलण्यासाठी दत्ताचा मोठा भाऊ बाबासाहेब रिठे यांच्या घरी गेले. त्यांनी दत्ता तुमची माफी मागेल, आणि सुनिताला नांदायलाही नेईल, असा शब्द दिला. त्यांनीच दत्ताला फोन करून बोलावून घेतले.

जावई चाकू घेऊनच गेला सासरवाडीत

मोठा भाऊ बाबासाहेबने फोन केल्यावर शनिवारी रात्री दत्ता सासरवाडीत गेला. बाबासाहेब यांनी त्याला सासू-सासऱ्यांची माफी मागायला सांगितले. मात्र, दत्ताने मी कोणाचीही माफी मागणार नाही, असे म्हणत त्यांना शिवीगाळ सुरु केली. पत्नी सुनितालाही अश्लिल भाषेत बोलला. त्यामुळे त्यांच्यात वाद सुरू झाला. सूर्यभान व योगेश या बाप-लेकाने त्याला ढकलत घरातून बाहेर काढले. अंगणात आल्यावर त्यांच्यात झटापट सुरु झाली. तेवढ्यात दत्ताने सोबत आणलेला चाकू काढला आणि सूर्यभान यांच्या पोटात खुपसला. रक्तस्त्राव होऊन सूर्यभान हे जमिनीवर कोसळले. काही क्षणात ते बेशुद्ध झाले. योगेशने तत्काळ रिक्षातून त्यांना मिनी घाटीत नेले. तेथील डॉक्टरांनी सूर्यभान यांना मृत घोषित केले.

७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी

आरोपी दत्ता पाटोळे हा खून करून पळून गेला होता. या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. पोलीस निरीक्षक गौतम पातारे, उपनिरीक्षक आत्माराम घुगे, तुपे यांच्यासह पथकने तांत्रिक तपास करून दत्ताला आज अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली, असे पोलिस निरीक्षक गौतम पातारे यांनी सांगितले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा