औरंगाबाद जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प प्राधान्याने पुर्ण करा - पालकमंत्री सुभाष देसाई  

औरंगाबाद जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प प्राधान्याने पुर्ण करा - पालकमंत्री सुभाष देसाई  

औरंगाबाद/प्रतिनिधी - औरंगाबाद-अहमदनगर प्रस्तावित रेल्वे मार्ग, विभागीय क्रीडा संकुलात निर्माण करण्यात येत असलेला ‘सिंथेटीक ट्रॅक’, संत एकनाथ महाराज संतपीठ, संत ज्ञानेश्वर उद्यान, सफारी पार्क,झकास पठार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी 'उभारी' प्रकल्प असे अनेक प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात हातभार लावणारे आहेत. असे  महत्वाकांक्षी प्रकल्प प्राधान्याने पुर्ण करुन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधावा  असे प्रतिपादन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
       औरंगाबाद  जिल्ह्याच्या विकासासंदर्भात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक पार पाडली. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, महापालिका प्रशासक अस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे आदी उपस्थित होते. बैठकीच्या सुरूवातीला विविध विभागांच्या कामांचे सादरीकरण करण्यात आले.

        पालकमंत्री म्हणाले की, जिल्हा व शहराच्या विकासासाठी आगामी  काळात अनेक महत्वाकांक्षी योजना राबविल्या जाणार आहेत. त्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक निधीची तरतूद मंजूर केली जाईल. या योजनामध्ये औरंगाबाद - अहमदनगर रेल्वे मार्गाचा समावेश असेल. या मार्गामुळे मनमाडला  जाऊन पुन्हा नगरला जाणारा वळसा वाचेल. शिवाय औरंगाबाद - पुणे   या शहराचे औद्यागिक संबंध घनिष्ठ असल्यामुळे या मार्गाचा फायदा मालाची आणि लोकांच्या वाहतूकीसाठी होईल. महत्वाचे म्हणजे  ही योजना जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल ठरेल. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या राज्यसमोर एक चिंतेचा विषय आहे. या  आत्महत्या रोखण्यासाठी  शासन गंभीर आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, आपल्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी 'उभारी' नावाची विशेष मोहिम राबविली जाणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी  तपशीलवार प्रस्ताव सादर केला आहे. या मोहिमेसाठी जी काही आर्थिक  मदत लागेल ती राज्य शासनाकडून मंजूर केली जाईल. याशिवाय जिल्ह्यात हवाई पर्यटनाला चालना देण्याबरोबरच जिल्ह्यातून जाणाऱ्या समृध्दी महामार्गामुळे  देखील वाहतूक वेगाने होईल, असेही त्यांनी सांगितले.
        बैठकीच्या सुरूवातीला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी विविध विकासकामांची आणि प्रकल्पांची माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून पालकमंत्री यांना दिली. ते म्हणाले की, संत एकनाथ महाराज संतपीठासाठी 23 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. आज संतपीठाचे काम पुर्णत्वाकडे असून आज घडीला 6 अभ्यासक्रम तयार करण्यात आलेले आहेत.  या संतपीठाला स्वायत्त संस्था म्हणून मान्यता द्यावी, विद्यापीठाकडे सुरूवातीच्या 5 वर्षांसाठी पालकत्व द्यावे असे ते म्हणाले.

          पेालिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी बिडकीन आणि शेंद्रा एमआयडीसीची हद्द वाढवावी, पोलिस आयुक्तालयात सुसज्ज सभागृह उभारण्यासाठी 15 कोटी तर प्रशिक्षण केंद्रासाठी 8 कोटी रुपयांची मागणी पालकमंत्र्यांकडे केली.
        मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. ते म्हणाले की, सफारी पार्कच्या फेज 1 चे काम सुरू झाले आहे. फेज 2 च्या कामांच्या निविदा प्रक्रीयेचे काम अंतिम टप्प्यात आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच गरवारे स्टेडीयमच्या विकासासाठी, छत्रपती शिवाजी महाराज पुराण वास्तू संग्रहालयासाठी, स्वातंत्र्यवीर सावरकर संशोधन केंद्रासाठी निधीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संत एकनाथ रंग मंदिराच्या नुतनीकरणाचे काम येत्या 3 महिन्यात पुर्ण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
        जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी जिल्हा परिषदेच्या नियोजित प्रशासकीय इमारतीबाबत माहिती दिली. तसेच 144 निजामकालीन शाळांपैकी 84 शाळांमधील 173 वर्गखोल्या बांधाव्या लागणार असल्याचे सांगितले. यासाठी 15 कोटी तर उर्वरित खोल्यांच्या दुरूस्तीसाठी 3 कोटींच्या निधीची मागणी केली.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा