शंभर कोटीचा निधी इतर कामांसाठी वळविणार

शंभर कोटीचा निधी इतर कामांसाठी वळविणार

छत्रपती संभाजीनगर/ प्रतिनिधी - तब्बल वर्षाभरानंतर झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत स्मार्ट सिटीच्या विविध विषयांना मंजूरी देण्यात आली. स्मार्ट सिटीने सिटीबस चालविण्यासाठी २०० कोटीचा निधी फिक्स डिपॉझिट करून ठेवला होता. त्यातील १०० कोटीचा निधी इतर कामांसाठी  वळविण्यास स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीस मान्यता देण्यात आली आहे.
तसेच इतर विषयांना देखील मंजूरी मिळाली असल्याची माहिती मनपा प्रशासक तथा आयुक्त आणि स्मार्ट सिटीचे सिईओ डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

स्मार्ट सिटी संचालक मंडळाची बैठक   गुरुवारी स्मार्ट सिटीच्या मेंटॉर तथा प्रधान सचिव विनिता वेद-सिंघल या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. मेंटॉर विनिता वेद-सिंघल या दुरदृष्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाल्या होत्या. स्मार्ट सिटीच्या कार्यालयात संचालक भास्कर मुंढे, उल्हास गवळी, सिईओ डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त सिईओ अरुण शिंदे, यांची उपस्थिती होती तर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय हे देखील दुरदृष्य प्रणालीद्वारे बैठकीस हजर होते.

स्मार्ट सिटी संचालक मंडळांनी विविध विषयांवर चर्चा करून घेतलेल्या निर्णयाची माहिती देताना सिईओ डॉ. चौधरी म्हणाले की, स्मार्ट सिटी संचालक मंडळांची यापूर्वीची बैठक ४ मार्च २०२२ रोजी झाली होती. त्यानंतर तब्बल वर्षभरानंतर ही बैठक होत आहे. या बैठकीत स्मार्ट सिटीने सिटीबस चालविण्यासाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवला होता. फिक्स डिपॉझिटवर मिळणार्‍या व्याजाच्या रक्कमेतून सिटीबसची देखभाल व दुरुस्ती केली जात होती. आता फिक्स डिपॉझिटमधील १०० कोटी इतर कांमाना (वर्ग करण्याचा)वळविण्याचा प्रस्ताव संचालक मंडळाच्या बैठकीसमोर ठेवण्यात आला होता. या प्रस्तावावर संचालकांनी चर्चा करून १०० कोटीचा निधी वळविण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेतला. उर्वरीत १०० कोटीचा निधी सिटीबस चालविण्यावर खर्च केला जाणार आहे. २०२८-२०२९ या वर्षापर्यंत सिटीबस चालविण्याची तरतूद करुन ठेवण्यात आली आहे. त्यासोबतच दररोज मिळणारे उत्पन्न देखील फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवले जात असल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले.

महामेट्रोच्या डिपीआरचा खर्च स्मार्ट सिटी करणार
वाळूज ते शेंद्रा एमआयडीसी दरम्यान अखंड उड्डाणपूल आणि मेट्रोचा (डीपीआर)सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कार्पोरेशन लि. कंपनीने महारेल्वे कार्पोरेशन महामंडळाला वर्कऑर्डर दिली आहे. मेट्रोचा डीपीआर तयार करण्यासाठी लागणार खर्च स्मार्ट सिटीतून करण्यास संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच मुख्य लेखाधिकारी यांच्या नियुक्तीसह इतर कामांना कार्योत्तर मंजूरीला मान्यता देण्यात आली.

दोन संचालकांची नियुक्ती
स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळामध्ये बदल झाला असून जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय आणि मनपा प्रशासक तथा आयुक्त आणि स्मार्ट सिटीचे सिईओ डॉ. अभिजित चौधरी यांना संचालक म्हणून मान्यता देण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला.

स्मार्ट सिटीच्या मेंटॉर तथा राज्याच्या उर्जा, उद्योग, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद-सिंघल या लवकरच छत्रपती संभाजीनगर येथे येऊन स्मार्ट सिटीच्या कामांचा आढावा घेणार आहेत. संचालक मंडळाच्या बैठकीतच त्यांनी ही माहिती दिली असल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा