औरंगाबाद / प्रतिनिधी - जिल्हा परिषद अंतर्गत होणाऱ्या सर्वसाधारण बदल्यांची तारीख अतिशय जवळ आली आहे ९ मे ते ११ मे दरम्यान होणाऱ्या बदल्या यंदा समुपदेशन प्रक्रियेतून करण्यात येणार आहेत. परंतु दिव्यांग व दुर्धर आजाराचे प्रमाणपत्र सादर करून अनेकांनी या बदलीतून सूट मागितली आहे. यामध्ये काही कर्मचाऱ्यांनी बोगस प्रमाणपत्र सादर केल्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे यांनी प्रमाणपत्र सादर केलेल्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले असून या कर्मचाऱ्यांची उद्या शनिवार (०६) रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात तपासणी करण्यात येणार आहे. यामुळे बोगस प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
मागील अनेक बदल्यामध्ये काही कर्मचाऱ्यांनी बोगस प्रमाणपत्रे सादर करून बदली आणि अन्य लाभ घेतल्याचे निदर्शनास आले होते. आताच्या बदलीमध्ये देखील असा प्रकार घडू शकतो याची शक्यता लक्षात घेता. सामान्य प्रशासन विभागातर्फे खबरदारी घेण्यात येत आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी प्रमाणपत्र सादर केले आहे, अशा कर्मचाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे घेऊन आरोग्य विभागात उद्या १२ ते २ या वेळेत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. अशा प्रकारच्या कागदपत्रे तपासणी मुळे बोगस कागदपत्रे सादर करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.