महापालिका नोकर भरती चा दुसरा टप्पा लवकरच
संभाजीनगर /प्रतिनिधी - महापालिकेला शासनाने पहिल्या टप्प्यात १२४ अन् दुसऱ्या टप्प्यात २६७ पदांची भरती करण्यासाठी परवानगी दिली. महापालिकेने पहिल्या टप्प्यातील १२४ पदांची भरती प्रक्रियाही राबविली.
यातील पात्र १५ उमेदवारांनी राजीनामे दिले.
त्यानंतर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचा विचार झाला. परंतु, त्यांनीही नकार दिला. परिणामी, दुसऱ्या टप्प्यातील २६७ पदांची भरती रखडली आहे. आता एप्रिलमध्येच ही प्रक्रिया होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
एक तर महापालिकेत अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या तोडकी आहे. दुसरीकडे सेवानिवृत्त होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. यामुळे महापालिका कंत्राटी कर्मचाऱ्यांवर सुरू असल्याचे दिसते. यासह रिक्त पदेही वाढत आहेत. परंतु, दरम्यानच्या काळात महापालिकेच्या आकृतिबंधाला शासनानेच मंजुरी दिली आहे. यानंतर महापालिकेच्या मागणीनुसार पहिल्या टप्प्यात १२४ पदांच्या भरतीसाठी शासनाने मंजुरी दिली.
आयबीपीएस एजन्सीने ही प्रक्रिया राबविली. परंतु, यातील १५ कर्मचाऱ्यांनी काही महिन्यांतच राजीनामे दिले. यात लेखा लिपिक, कनिष्ठ अभियंता, सहायक अभियंता, स्वच्छता निरीक्षक यांचा समावेश आहे. यानंतर नियमानुसार प्रतीक्षा यादीतील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार प्रक्रियाही राबविली. परंतु, यात केवळ तीन कर्मचारीच रुजू झाले. पुन्हा तीन जणांनी राजीनामे दिले. भरती प्रक्रियेनंतर वर्षभर प्रतीक्षा यादीनुसार प्रक्रिया राबविणे आवश्यक असते. त्यामुळे वर्षभरापासून ही प्रक्रिया सुरू आहे. यात दुसऱ्या टप्प्यातील २६७ पदांच्या भरतीसह त्यांच्या बिंदूनामावलीची प्रक्रिया रखडली आहे.
तर २८२ पदांसाठी भरती
मागील भरतीतील १५ जणांनी राजीनामे दिले. नियमानुसार वर्षभरात ही पदे भरण्याची प्रक्रिया केली जाते. मार्चमध्ये या प्रक्रियेची मुदत संपणार आहे. आता मार्चपर्यंत यातील रिक्त पदांची भरती न झाल्यास दुसऱ्या टप्प्यातील भरती करावयाची २६७ आणि ही पंधरा अशी एकूण २८२ पदांसाठी एप्रिलमध्येच भरती प्रक्रिया करावी लागेल.