जिल्ह्यातील आरोग्य विभागात नवीन 50 नविन रुग्णवाहिका दाखल महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते लोकार्पण
औरंगाबाद / प्रतिनिधी - 14 व्या वित्त आयोगाच्या ग्रामपंचायत स्तरावरील व्याजाच्या रक्कमेतून तसेच जिल्ह्यातील आमदारांच्या स्थानिक निधी व ईतर योजनेतून औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या एकूण 50 रुग्णवाहिका दाखल झाल्या. या रुग्णवाहिकांचे लोकार्पण महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. दि.11 सप्टेंबर रोजी औरंगाबाद जिल्हा परिषदच्या प्रांगणात हा लोकार्पण सोहळा पार पडला.
जिल्ह्यातील 50 प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रत्येकी एक याप्रमाणे या रुग्णवाहिका मिळणार आहेत.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, जि. प. उपाध्यक्ष एल.जि.गायकवाड, जि. प. माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, रामराव शेळके, जि. प.आरोग्य सभापती अविनाश गलांडे, जि. प. बांधकाम सभापती किशोर बलांडे , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत सदरील रुग्णवाहिका गोरगरीब रुग्णांना तसेच कोरोना संकट गेल्यानंतर देखील गरजू रुग्णांना सेवा देत राहील असा विश्वास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी बोलतांना व्यक्त केला. जिल्ह्यातील आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. कोरोना संकटात जिल्हा आरोग्य केंद्राची कामगिरी अतिशय कौतुकास्पद राहिली. आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्यात असून लवकरच आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
14 व्या वित्त आयोगाच्या व्याजावरील रक्कम पुण्याला पडून होती. यासाठी पाठपुरावा करून 14 व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या रक्कमेतून जिल्ह्यासाठी 20 रुग्णवाहिका खरेदी केल्या. सामान्यांच्या रुग्णसोयीसाठी या रक्कमेचा वापर होणार असल्याने याचे समाधान होत असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
14 व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या रक्कमेतून 20, राज्यमंत्री अब्दुल सत्तार सिल्लोड , यांच्या स्थानिक निधीतून 4, आ. हरिभाऊ बागडे फुलंब्री, यांच्या स्थानिक निधीतून 4 आ. उदयसिंग राजपूत कन्नड ,यांच्या स्थानिक निधीतून 4 तर आ. रमेश बोरणारे वैजापूर यांच्या स्थानिक निधीतून 7, सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र च्या माध्यमातून 9, डॉ. शाम प्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन मिशन योजनेतून 1 आणि जिल्हा परिषद उपकर योजनेतून 1 असे एकूण 50 अत्याधुनिक रुग्णवाहिका जिल्ह्यासाठी दाखल झाल्या आहेत.