विभागीय 'सरस' प्रदर्शनासह अजिंठा महोत्सवाचे परिपूर्ण नियोजन करावे- राज्यमंत्री अब्दुल सत्तार

विभागीय 'सरस' प्रदर्शनासह अजिंठा महोत्सवाचे परिपूर्ण नियोजन करावे- राज्यमंत्री अब्दुल सत्तार

सिल्लोड  /प्रतिनिधी -  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत महिला समूहाच्या उत्पादनांचे विभागीय 'सरस' प्रदर्शन 2021-22 अजिंठा येथे भरवण्याचे व त्यास जोडून 'अजिंठा' महोत्सवाचे परिपूर्ण नियोजन करण्याबाबतच्या सूचना महसूल, ग्रामविकास, बंदरे व खार जमीन विकास व विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. 
राज्यमंत्री श्री.सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार ( दि.14 ) रोजी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात  विभागीय 'सरस' प्रदर्शनाच्या व 'अजिंठा महोत्सव' आयोजनाबाबत बैठक झाली. बैठकीस विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेंमत वसेकर, उपायुक्त (विकास) अनिल कुमार नवाळे, प्रकल्प संचालक संगीतादेवी पाटील, पर्यटन उपसंचालक श्रीमंत हरकळ, आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना श्री.सत्तार म्हणाले, हे वर्ष आपण 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' म्हणून साजरा करत आहोत. त्या पार्श्वभूमीवर महिला समूहाच्या उत्पादनांचे 'सरस' प्रदर्शनाचे आयोजन अजिंठा येथे करणे वैशिष्ट्यपूर्ण ठरेल. तसेच या  आयोजनासोबतच 'अजिंठा महोत्सव' भरवल्यास संपूर्ण मराठवाड्यासह जळगाव, बुलढाणा जिल्हेही पर्यटन व सांस्कृतिक दृष्ट्या जोडली जातील. यावर्षी महोत्सव यशस्वीरित्या पार पडल्यास दरवर्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात येऊन महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी, पर्यटनवृध्दी या गोष्टी साध्य होतील. त्यादृष्टीने जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वात सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने 'सरस' प्रदर्शन, अजिंठा महोत्सवाचे नियोजन करावे. तसेच आवश्यक निधी, इतर पुरक बाबी उपलब्ध कराव्यात.  परिपूर्ण नियोजन करण्यासंदर्भात सर्व संबंधित यंत्रणांनी पाहणी करावी. कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काटेकोरपणे नियोजन करुन प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना यावेळी श्री.सत्तार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
विभागीय आयुक्त् सुनील केंद्रेकर यांनी कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी परिपूर्ण व प्रतिबंधात्मक खबरदारीसह 'सरस' प्रदर्शन व 'अजिंठा' महोत्सवाची तयारी करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.   

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा