पुण्यात वाढत आहे गुन्हेगारी घटना बघून येतील अंगावर शहारे

पुणे /प्रतिनिधी -  पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच आहे.  ड्रग च्या प्रकरणानंतर आता भर रस्त्यावर हत्येचा थरार समोर आला आहे.
 यात काही गुंडांनी भररस्त्यात राडा केल्याचं पाहायला मिळत आहे.पुण्यातील खडकवासला भागातून ही घटना समोर आली आहे.  या गुंडानी काही लोकांवर तलवार आणि कोयत्याने हल्ला केला आहे. ही घटना गोऱ्हे बुद्रुक गावातील असल्याचं सांगण्यात आलं आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. ज्यात 10-12 जणांच्या टोळक्याने कोयते-तलवारीने 3 जणांवर हल्ला केला असल्याचं दिसत आहे.

विशेष म्हणजे हा हल्ला भररस्त्यात करण्यात आला आहे. रस्त्यावर इतर लोकांची ये-जा सुरू आहे. मात्र, गुंडांना याची कसलीही भीती दिसली नाही. या टोळक्याने धावत येत दुचाकी अडवली आणि त्यानंतर गाडीवरील तरुणांवर कोयता आणि तलवारीने वार करत त्यांनी जखमी केलं असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. हल्ल्याची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
ही घटना 6 मार्च रोजी रात्री घडल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला काही लोक धावत येत रस्त्यावर एका गाडीची वाट बघत असल्याचं दिसतं. ही गाडी समोर येताच हे गुंड गाडी अडवून त्यावर बसलेल्या तरुणांवर कोयता आणि तलवारीने हल्ला करताना दिसतात. हे दृश्य हादरवून टाकणारं आहे. आता या प्रकरणात काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा