कधी होणार या उड्डाणपुलाचे काम पूर्ण

औरंगाबाद/ प्रतिनिधी - सात वर्षापूर्वी मंजुरी मिळालेल्या उड्डाणपुलाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही आणि सध्या सुरू असलेल्या कामाची गती पाहता हा पूल आणखी किती दिवसात तयार होईल असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे. छावणी रेल्वे रुळावर उड्डाणपुलाच्या कामाला आणखी किती वर्षे लागतील असा प्रश्न सर्वत्र चर्चिला जात आहे.
औरंगाबाद नगर महामार्गावरील छावणी परिसरातील रेल्वे रूळावर असलेल्या उड्डाणपुलाचे काम संथ गतीने होत असल्यामुळे वाहनधारक आणि औद्योगिक परिसरातील कामगारांना शहरात ये जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रेल्वे रुळावरील उड्डाणपुलाच्या कामाला 2014 साली मान्यता मिळाली होती. तर त्या वर्षीच निधी सुद्धा उपलब्ध करण्यात आला होता. मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एक पूल उभारण्यासाठी प्रशासनाला जवळपास सात वर्षाचा कालावधी लागत असल्याचे दिसून येते. उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूने असलेले रस्ते हे अनेक वर्षापूर्वी चौपदरीकरण करण्यात आले आहे. मात्र रेल्वेवरील उड्डाणपूल करण्यासाठी प्रशासनाला इतक्या वर्षांचा कालावधी का लागत आहे याचे उत्तर अजूनही प्रशासनाकडून दिले जात नाही. या उड्डाणपुलामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला.
दररोज वाळूज औद्योगिक परिसरात काम करणारे कामगार आणि उद्योजक यांना अनेक अडचणींचा सामना करून या पुलावरून ये-जा करावी लागत आहे. औरंगाबाद, नगर, पुणे आणि मुंबई असा हा मार्ग असल्यामुळे या मार्गावर नियमितपणे वाहनांची मोठी वर्दळ असते. तर सकाळी आणि सायंकाळी कामगार आणि उद्योजक यांना कामावर जाण्यासाठी या मार्गाचा वापर करावा लागत असल्याने दोन्ही वेळेला वाहतुकीची मोठी कोंडी या उड्डाणपुलावर निर्माण झाल्याचे दिसून येते. अनेकदा तर जुन्या पुलावर एखादे वाहन बंद पडले तर दोन्ही बाजूने दोन-तीन किलोमीटरपेक्षा जास्त रांगा लागलेल्या दिसून येतात महत्त्वाचं म्हणजे या मार्गावरून अनेक प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचा वावर असतो मात्र या पुलाच्या कामाकडे अजूनही कुणी गांभीर्याने बघितलेले दिसून येत नाही. सर्वसामान्यांना होणारा त्रास कदाचित प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना दिसत नसावा असेच या उड्डाणपुलाच्या संथगतीने सुरू असलेल्या कामावरून दिसते.

याच रस्त्यावरील दुसरा पूल दोन ते तीन वर्षात तयार

छावण्यातील रेल्वे रुळावर उड्डाणपुलाचे काम आणि मिळालेली मंजुरी याला सात वर्षापेक्षा जास्त वेळ झाल्याचे दिसून येते तर औरंगाबाद-नगर महामार्गावरील क्लब चौकात मोठा पूल दोन ते तीन वर्षात पूर्ण झाला असून या मार्गावर वाहनांची ये-जा सुरू झाली आहे मात्र छावणीतील उड्डाणपुलाला अजूनही पूर्णत्वास जाण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता दिसून येते. याच मार्गावर एक पूल जर कमी कालावधीत पूर्ण होत असेल आणि एका पुलाला अनेक वर्षे लागत असतील तर प्रशासनाची चूक ही सर्वांना दिसून येत आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा