महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा सुप्रीम कोर्टाचे आदेश
औरंगाबाद /प्रतिनिधी - गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महापालिका निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेशात द्वारे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगास प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिलेआहेत. त्यानुसार औरंगाबाद महापालिका निवडणूक लवकरच होणार हे निश्चित झाले आहे.
महाराष्ट्र विधानसभेने दिनांक 11 मार्च 22 रोजी पारित केलेल्या दोन कायद्यांन्वये राज्य निवडणूक आयोगाचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील प्रभाग रचनेचे अधिकार काढून घेतले होते. त्याचप्रमाणे राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी केलेली निवडणुकीची सर्व प्रक्रिया सदर कायद्यांन्वये रद्दबातल ठरविण्यात आली होती. पवन शिंदे, उल्हास संचेती व इतर याचिकाकर्ते यांनी दोन्ही कायद्यांना आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर केल्या होत्या. सदर याचिकांवर आज न्यायमूर्ती ए.एम खानविलकर, न्यायमूर्ती अभय ओक व न्यायमूर्ती सि टी रवीकुमार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यात गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असून संवैधानिक तरतुदींचे पालन न करता प्रशासनामार्फत स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार पाहिला जात असून राज्य निवडणूक आयोगाला त्वरित निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात यावे असा युक्तिवाद करण्यात आला. प्रभाग रचनेची कार्यवाही आता यापुढे शासनस्तरावर येणार असल्याचा मुद्दा राज्य शासनाच्या वतीने उपस्थित करण्यात आला. राज्य निवडणूक आयोगाने प्रलंबित निवडणुका असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची तसेच यापुढे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपणार आहे त्यांची आकडेवारी सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केली व आयोगाने वेळोवेळी मुदतीच्या आत निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणली.
सर्व पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेशात द्वारे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगास प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले. राज्य सरकारच्या विनंतीवरून सदर प्रक्रिया याचिकेतील निर्णयाच्या अधीन राहून करण्यात येणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. राज्यातील प्रलंबित सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
सदर याचिकांमध्ये याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. परमेश्वर, ॲड. सुधांशू चौधरी, ॲड. देवदत्त पालोदकर, ॲड.शशिभूषण आडगावकर, ॲड. कैलास औताडे, राज्य निवडणूक आयोगातर्फे ॲड अजित कडेठाणकर तर राज्य शासनातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ शेखर नाफडे, ॲड. राहुल चिटणीस काम पाहत आहेत.