स्वछता प्रीमियर लीग-2 मध्ये 125 कर्मचाऱ्यांचा सन्मान
औरंगाबाद /प्रतिनिधी- भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात रविवार दि.२६ सप्टेंबर रोजी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव या अभियानातर्गत स्वच्छता प्रीमियर लीग -२या कार्यक्रमांत महानगरपालिकेच्या 125 स्वच्छता कर्मचाऱ्यांचा महानगरपालिका आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय यांच्या हस्ते बक्षिस देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी शहराच्या स्वच्छतेचा नावलौकिक दिवसेंदिवस वाढत असून येणाऱ्या काळात औरंगाबाद शहर हे टॉप फाईव्ह मध्ये आणल्यास तुम्ही माझ्याकडून तुमच्यासाठी मोठ्या घोषणेची अपेक्षा नक्कीच करू शकता, असे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, शहरातील पडेगाव, चिकलठाणा आणि कांचनवाडी कचरा प्रक्रिया केंद्र कार्यान्वित झाले असून लवकरच हर्सुल कचरा प्रक्रिया केंद्र देखील कार्यान्वित होणार आहे यामुळे मागील काळात घनकचरा व्यवस्थापनाचा निर्माण झालेला प्रश्न मार्गी लागला आहे .मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी शहर जास्त स्वच्छ दिसत आहे. अशा प्रतिक्रिया बाहेरून आलेल्या लोकांकडून मला मिळत आहेत याचा मला अभिमान आहे. या पुढच्या काळात कचऱ्या पासून उत्पन्न निर्मिती होणार आहे. घनकचरा बाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी यासाठी त्यांच्याशी घनकचरा व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांनी संवाद साधून त्यांना या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्यावे, घनकचरा व्यवस्थापनाबाबत नागरिकांची देखील जबाबदारी आहे याची जाणीव ही नागरिकांनी ठेवावी ,असे ही मनपा प्रशासकांनी सांगितले.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत खाम नदी व शहरातील नाल्यांची सफाई चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे यावर्षी पडलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम मागच्यापेक्षा कमी झाला असल्याचे ते म्हणाले. यावेळी मनपा प्रशासकांनी स्वच्छतेच्या कामात सहभागी असलेल्या सर्व महापालिकाअधिकारी ,कर्मचारी तसेच इको सत्व च्या नताशा झरिन व गौरी मिराशी यांचे त्यांनी कौतुक केले. या सत्कार समारंभात 125 कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यात स्वच्छता कर्मचारी 18, कचरा संकलन कर्मचारी 30, कचरा वेचक महिला पाच यांचा डिनर सेट व मिठाई तसेच प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. जवान 21, सुपरवायझर 9 ऑपरेटर 3 सी आर टी प्रतिनिधी दोन, प्लांट सुपरवायझर दोन यांना बॅग ,मिठाई , प्रमाण पत्र देऊन तर 34स्वच्छता निरीक्षकांना स्मार्ट वॉच मिठाई व प्रमाणपत्र देऊन तर झोन क्रमांक 9 चे वार्डअधिकारी संपत जरारे यांचा घनकचरा व्यवस्थापनामध्ये मोलाचे मार्गदर्शन व सहभाग असल्यामुळे त्यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम, उपायुक्त सौरभ जोशी, घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे, कार्यकारी अभियंता ए बी देशमुख, बी डी फड तसेच महापालिकेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.